गावठी कट्ट्यासह हत्यारे जप्त
By Admin | Updated: June 13, 2017 01:42 IST2017-06-13T01:41:51+5:302017-06-13T01:42:13+5:30
सराईत गुन्हेगार : पोलीस गस्तीपथकाने रचला सापळा

गावठी कट्ट्यासह हत्यारे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : अमरधाम परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांकडून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व हत्यारे जप्त केली आहेत.आकाश दीपक लाटे, विनायक ऊर्फ झगड्या दीपक लाटे (रा़ पाथरवट लेन, पंचवटी) व योगेश चंद्रकांत शेलार (रा़ नाग चौक, पंचवटी) अशी या गुन्हेगारांची नावे असून, सोमवारी (दि़ १२) पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे़
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना पंचवटीतील सराईत गुन्हेगार अमरधाम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ पहाटेच्या सुमारास रेकॉर्डवरील हे तिघे संशयित गणेशवाडीकडून अमरधामकडे अॅक्टिवा दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या गस्तीपथकाने सापळा लावून या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांची झडती घेतली असता लाटे बंधूंकडे गावठी कट्टा, जिवंत काडतूस व लोखंडी कोयता अशी हत्यारे आढळून आली़ पंचवटी पोलीस ठाण्यात या तिघाही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़