Nashik Crime Case ( Marathi News ) : दोन वर्षांपूर्वी वडाळा गावातील माळी गल्लीत राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये वाद होऊन पत्नीने नवऱ्याचा निर्घृण खून केला आणि मृतदेह पलंगाखाली लपवून खोलीला कुलूप लावून पोबारा केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी जगमलानी यांनी आरोपी नंदाबाई दिलीप कदम (३६, रा. वडाळा) हिला जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी (दि.३) सुनावली.
नंदाबाई ही मयत दिलीप रंगनाथ कदम (४९) यांची दुसरी बायको होती. या दोघांमध्ये कौटुंबिक कलह होऊन २४ सप्टेंबर २०२२ साली वाद झाला होता. यावेळी नंदाबाई हिने पहाटेच्या सुमारास लोखंडी खिळे असलेल्या फळीने दिलीप यांना मारहाण करत जखमी केले. त्यानंतर पोटात चाकू भोसकून ठार मारत गळा आवळला होता. त्यांचा मुलगा रोशन कदम (२५) हा जेव्हा वडिलांना बघण्यासाठी माळी गल्लीतील घरात आला तेव्हा त्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांनी धाव घेतली होती.
याप्रकरणी सखोल तपास करत पोलिसांनी येवला येथून नंदाबाई हिला तिच्या मैत्रिणीच्या घरातून अटक केली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी अभियोक्ता शिरीष गोपाळराव कडवे यांनी युक्तिवाद करत एकूण २४ साक्षीदार न्यायालयात तपासले. जगमलानी यांनी साक्ष व पुराव्यांअधारे नंदाबाई हिला दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.