कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान; लक्षणांकडे ठेवा लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:13+5:302021-06-17T04:11:13+5:30

नाशिक : कोरोनाबाधितांपैकी काही नागरिकांना किडनीशी संबंधित आजार होण्याचे किंवा त्यासंबंधित आजारांची तीव्रता वाढण्याच्या तक्रारी येऊ लागल्या ...

Kidney damage caused by corona; Pay attention to the symptoms! | कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान; लक्षणांकडे ठेवा लक्ष!

कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान; लक्षणांकडे ठेवा लक्ष!

नाशिक : कोरोनाबाधितांपैकी काही नागरिकांना किडनीशी संबंधित आजार होण्याचे किंवा त्यासंबंधित आजारांची तीव्रता वाढण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत, तसेच बहुतांश किडनी विकारांनी ग्रस्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची उदाहरणेदेखील आहेत. किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्याने प्रत्येक नागरिकाने कोरोनानंतर आपल्या किडनीचीदेखील प्रकर्षाने काळजी घेणे किंवा किडनी विकारग्रस्तांनी तर सर्वाधिक दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.

किडनी विकारग्रस्त, तसेच किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया झालेल्या संबंधित रुग्णांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्यामुळे किडनीशी संबंधित विकारांनी ग्रस्त नागरिकांना कोरोनाच्या काळात सर्वाधिक दक्षतेने वावरणे आवश्यक झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये हजाराहून अधिक पेशंट डायलिसिसवर आहेत, तर नाशिक विभागात ही संख्या तीन हजारांहून अधिक आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च परवडत नसतो. त्यामुळे डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांसाठी, तर कोरोना अनेकदा जिवावर बेतणारा ठरला आहे. डायलिसिससाठी कोरोनाकाळातही त्यांना घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्याने तर त्यांची अवस्था काहीही कमी जास्त झाले तरी प्राणाशी गाठ अशीच असते. अनेक किडनी विकारग्रस्तांनादेखील कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सर्वाधिक झळ किंवा जिवाचीच बाजी लावावी लागली आहे. त्यामुळे कोरोनाचे भय आणि त्याचा प्रसार लवकर संपुष्टात येणे हेच किडनी विकारग्रस्तांसाठी सध्या सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

इन्फो

नियमित तपासणीला महत्त्व

रक्तदाब वाढलेला राहिल्यास किडनीतील नसांवर दाब वाढून परिणाम होऊ लागतो. लघवीत प्रोटीन जाणे सुरू होते. रक्तातील युरिया वाढू लागेल म्हणून रक्तदाब १४०-८० च्या खाली राहणे व लघवीत प्रोटीन असणाऱ्यांसाठी १३०-८० च्या खाली राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी औषधी नियमित घेणे, महिन्यातून कमीत कमी दोनदा बीपी तपासणे आवश्यक असते. किडनीवरील प्रभाव ओळखण्यासाठी व त्याची उपाययोजना तत्काळ सुरू करण्यासाठी वर्षातून एकदा लघवीतील प्रोटीन व रक्तातील क्रिएटिनीन तपासणे गरजेचे आहे.

इन्फो

किडनीचा रुग्ण बाधित झाल्यास...

कोरोनासह काही विशिष्ट आजारातील वेदनाशामक औषधी, काही अ‍ॅँटिबायोटिक्स, स्टेरॉइड, गावठी औषधे इत्यादीमुळे किडनीला इजा होते. ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे, त्यांना अशी औषधे धोकादायक असतात. त्यामुळे किडनीचा रुग्ण बाधित झाल्यास त्याने सर्वप्रथम आपल्या किडनीच्या नियमित डॉक्टरांशी असलेला संपर्क कायम राखून त्यांना कोरोनाबाबतची माहिती देणे आवश्यक आहे, तसेच जे डॉक्टर कोरोनासाठी उपचार करणार असतील, त्यांना किडनीच्या आजाराची, त्यातील प्रकृतीच्या सद्य:स्थितीची, सध्याच्या औषधोपचाराची पूर्ण माहिती देणे आवश्यक असते.

इन्फो

नियमित डॉक्टरांशी बोलूनच स्टेरॉइड

कोणत्याही किडनी विकारग्रस्त नागरिकाचे दिवसभरातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण तीन ते चार लिटर असावे. त्यातून किमान दोन लिटरपर्यंत लघवी झाली पाहिजे. त्यामुळे नवीन खडा तयार होणे व असलेला खडा मोठा होत नाही. मूतखड्यामुळे लघवीला अडथळा होत असल्यास त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह व उच्चदाब या दोन प्रमुख कारणांमुळे मूत्रपिंडे निकामी होत असल्याने या आजारांनी बाधित नागरिकांनीदेखील किडनी विकाराबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे असते. त्यामुळे किमान किडनी विकारग्रस्तांनी किडनीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे.

कोट

किडनी विकारग्रस्तांनी स्वत:ची प्रचंड काळजी घेणे नितांत आवश्यक आहे. कोरोना काळात औषधोपचारात खंड पडू न देणे, तसेच आपल्या नियमित डॉक्टरांशी किमान फोनवरून संपर्क कायम ठेवून शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती देत राहणे सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे.

डॉ. शाम पगार, किडनी विकार तज्ज्ञ

Web Title: Kidney damage caused by corona; Pay attention to the symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.