अपहरण करून युवकाची हत्त्या
By Admin | Updated: April 3, 2015 01:16 IST2015-04-03T01:16:02+5:302015-04-03T01:16:24+5:30
सातपूर येथील घटना : तिघा संशयितांवर गुन्हा दाखल

अपहरण करून युवकाची हत्त्या
सातपूर : बुधवारी रात्रीच्या सुमारास अपहरण केलेल्या अशोकनगर येथील युवकाचा मृतदेह दुपारी वासाळी शिवारात आढळून आला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल मोहिते असे या मृत युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर येथे राहणारा अमोल सुधीर मोहिते (२८) हा बुधवार दि. १ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आपला लहान भाऊ वैभव याच्यासोबत गप्पा मारत असताना याचवेळी पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनमधून आलेल्या तिघांनी या दोघा भावांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात वैभव जखमी झाला, तर अमोल याचे व्हॅनमधून अपहरण करण्यात आले. घटनेनंतर वैभव याने सातपूर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रात्रभर अमोलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमोलचा मृतदेह वासळी शिवारात आढळून आला. वासाळी शिवारात एक अनोळखी इसम मृत्यूमुखी पडल्याची माहिती माजी सरपंच शांताराम चव्हाण यांनी सातपूर पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सदर मृतदेह हा अमोलचाच असल्याचे निष्पन्न झाले. मयत अमोलचा भाऊ वैभव याने दिलेल्या फिर्यादीवरून रोशन काकड, दीपक भालेराव आणि बाळू नागरे(सर्व रा. पिंपळगाव बसवंत) यांनीच अमोलचे व्हॅनमधून अपहरण करून नंतर खून केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित तिघेही फरार झाले आहेत.