खानगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:22 IST2020-02-17T22:54:46+5:302020-02-18T00:22:38+5:30
खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.

खानगाव रस्त्याची दुरवस्था
निफाड : खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याबाबत मागणी होत असताना कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. खानगाव थडी ते ब्राह्मणवाडे यादरम्यान तारू खेडले, तामसवाडी, करंजी ही गावे येतात. या नऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेही वाहनधारकांना कळेनासे झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. शिवाय या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून, वाहन चालविणे अत्यंत धोकादायक ठरले आहे. विशेष म्हणजे तारू खेडले ते ब्राह्मणवाडे या दरम्यानच्या रस्त्यावर जवळजवळ चाळीस ते पन्नास ठिकाणी नाल्या पडलेल्या आहे. या नाल्यातून वाहन जाताना वाहने आपटल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड होऊन बसले आहे. या खड्ड्यामुळे वाहनांची सुद्धा वाट लागली असून, वाहने वारंवार दुरुस्त करावी लागतात. थोडक्यात सदरचे खड्डे आणि नाले पार करताना डोंगरदऱ्यातील दुर्गम भागातून जातो की काय अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. ब्राह्मणवाडे करंजी, तामसवाडी, तारू खेडले येथील शेतकऱ्यांना नागरिकांना सायखेडा आणि निफाड येथे विविध कामांसाठी जावे लागते, परंतु या खड्ड्यांमुळे येण्या जाण्यातच भरपूर वेळ या नागरिकांचा जात असतो आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावरून सायखेडा, निफाड, पिंपळगावबसवंत, विंचूर मार्केटसाठी शेतकरी कांद्याचे ट्रॅक्टर नेत असतात. परंतु प्रचंड खड्ड्यांमुळे हे कांद्याचे ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होते. त्यामुळे मार्केटला पोहोचण्यास उशीर होत असतो.
तारू खेडले तामसवाडी करंजी, ब्राह्मणवाडे, हा परिसर बिबट्याप्रवण नसल्याने रात्रीच्या अंधारात हळुवारपणे वाहने चालविताना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. या रस्त्याची दहा वर्षांत साधी डागडुजी सुद्धा झाली नाही. त्यामुळे गोदाकाठच्या या नागरिकांनी या रस्त्याबाबत प्रचंड हाल सोसले त्यामुळे २० वर्षांपासून या भागातील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. या रस्त्याची अशी दुरवस्था गेल्या दहा वर्षांपासून आहे. आता तरी या रस्त्याचे डांबरीकरण करून आमच्यावरचा वनवास व अन्याय थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तामसवाडी ते करंजी यादरम्यान कासारी नाला असून,पावसाळ्यात या नाल्यात पाणी साचल्याने असल्याने ब्राह्मणवाडे, करंजी या गावातील नागरिकांना सायखेडा, निफाडकडे येणे मुश्किल होते. मागील वर्षी या नाल्यात पाणी साचल्याने वाहतूक बंद झाल्याने करंजी येथून मांजरगाव शाळेसाठी येणाºया विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. त्यामुळे आम्ही दुर्गम भागात राहतो की काय असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. या नाल्यावर छोटा पूल बांधावा, अशी या नागरिकांची मागणी आहे.