‘खाकी’चे कर्तव्य बजावले; मात्र लोकशाहीच्या अधिकारापासून पोलीस वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:27 IST2019-04-30T16:22:34+5:302019-04-30T16:27:11+5:30
निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते

‘खाकी’चे कर्तव्य बजावले; मात्र लोकशाहीच्या अधिकारापासून पोलीस वंचित
नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढविला; मात्र मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी, यासाठी डोळ्यांत तेल घालून बंदोबस्तावर असलेल्या ‘खाकी’च्या कर्मचाऱ्यांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही; मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’चे कर्तव्य चोखपणे बजावले हे तितकेच खरे.
पोलीस म्हटला की, बंदोबस्त आलाच. त्याला कुठलाही सण, उत्सव साजरा करता येत नाही व सण-उत्सव नागरिकांचे शांततेत साजरे व्हावे, यासाठी तो रस्त्यावर असतो. सोमवारी (दि.२९) लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा राष्टÑीय महोत्सव साजरा होत असतानाही नेमके हेच चित्र पहावयास मिळाले. पोलीस कर्मचारी वर्दी घालून रस्त्यावर उभा राहिला. मतदारांना लोकशाहीचा अधिकार निर्धास्त व सुरक्षितपणे बजावता यावा, यासाठी रणरणत्या उन्हात पोलीसदादाने खाकीचे ‘कर्तव्य’ बजावले.
निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते; कारण ज्या केंद्राबाहेर ‘ड्युटी’ आहे, ते कें द्र सोडून ज्या केंद्रात नाव आले आहे, त्या केंद्रावर पोहचता येत नाही. त्यामुळे मतदानावर पाणी सोडावे लागते, असे काही पोलीस कर्मचा-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मतदानासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले जवळपास दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. वरिष्ठ अधिका-यांनी जरी मतदानाचा हक्क बजावला असला तरी पोलीस शिपाईपासून हवालदारपर्यंत सर्वांना मतदानापासून वंचित रहावे लागले ही वस्तूस्थिती. नाशिक पोलीस आयुक्तालयातील केवळ २० ते २५ टक्के कर्मचा-यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी निम्म्याहून अधिक कर्मचा-यांना मतदानप्रक्रियेवर पाणी सोडावे लागले हे खरे.
टपालीची व्यवस्था अयशस्वी
बंदोबस्तावरील अधिकारी-कर्मचा-यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. मतदानाच्या तीन दिवसांअगोदर टपाली मतदानासाठी कागदपत्रे द्यावी लागतात. मात्र निवडणूक मतदानापूर्वीच पोलिसांना बंदोबस्तावर हजर व्हावे लागत असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. एकतर ग्राउंड बंदोबस्त नाहीतर बुथ बंदोबस्त असतो त्यामुळे आपली जागा सोडता येत नाही.