खडसे गेले; पण न गेलेल्यांत अस्वस्थता कमी नाही !

By किरण अग्रवाल | Published: October 24, 2020 11:47 PM2020-10-24T23:47:40+5:302020-10-25T03:54:24+5:30

जरी गेले नाथाभाऊ, आम्ही आहोत तेथेच राहू, अशा भूमिकेत जागोजागचे अनेकजण असल्याने पक्षाला त्यांच्या जाण्याचा धक्का वगैरे काही बसलेला नाही, असे भाजपास म्हणता येऊ नये. स्वबळ सिद्ध करण्याच्या नादात वारेमाप भरती करून स्वकीयांचे पंख छाटले गेल्याने सर्वच ठिकाणी दुखावले गेलेले मोठ्या प्रमाणात आहेत. अशांच्या वेदनेची एक प्रतीकात्मक परिणीती म्हणून खडसे यांच्या पक्ष सोडून जाण्याकडे पाहता यावे.

Khadse is gone; But the discomfort of those who have not gone is not less! | खडसे गेले; पण न गेलेल्यांत अस्वस्थता कमी नाही !

खडसे गेले; पण न गेलेल्यांत अस्वस्थता कमी नाही !

Next
ठळक मुद्देनाशिक भाजपातही दुखावलेले अनेक; त्यांच्या असंतोषाच्या ढिगाऱ्यावर बसून किती दिवस रेटून नेणार?सर्वमान्य स्थानिक नेतृत्वाचा अभाव ...खडसेंच्या जाण्याने निष्ठावंतांमधील धुम्मस लक्षात यावी..दोन दोन टर्म आमदारक्या मिळवणारेही आपल्या समर्थकांमध्येच गुंतलेले.


लटपटणाºया पायांत उसने बळ आणून फार लांब पळता येत नाही, उलट तसे प्रयत्न करू पाहता मध्येच म्हणजे अर्ध्यावर डाव सोडण्याची वेळ येते. राजकीय संदर्भाने बघता, राज्यातील भाजपा हाच अनुभव घेत असावी. एकनाथ खडसे यांच्या सोडचिठ्ठीकडे म्हणूनच या पक्षाने गांभीर्याने पहायला हवे, कारण खडसे पक्ष सोडून गेले असले तरी पक्षात राहूनही नाराजीने धुमसत असलेले जागोजागी कमी नाहीत.

कमी वेळेत ब-यापैकी मजल मारून आत्मनिर्भरतेचा साक्षात्कार झाल्यामुळेच यंदा भाजपास राज्यातील सत्तेचा डाव गमवावा लागला हे आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज राहिलेली नाही. पण तसे असूनही हा पक्ष व त्याचे नेते ठाकरेंच्या ठोकरेतून न सुधारता आपल्या तोºयात राहिले, दुखावलेल्यांना न गोंजारता ताठ्यात राहिले; त्यातूनच खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ व जनाधार असलेल्या नेत्याचे बहिर्गमन घडून आले. अर्थात, डावलले गेलेले, दुखावलेले व मनातल्या मनात तळमळत असलेले अनेकजण ठिकठिकाणी आहेत, जे कुचकामी ठरलेल्या निष्ठांना कुरवाळत अच्छे दिन येण्याची वाट बघत आहेत; पण उपेक्षा व दुर्लक्षातील सातत्य टिकून असल्याने पक्षात असूनही ते अस्वस्थ आहेत. आपली नाराजी बोलून मोकळे होणारे किंवा प्रसंगी बाहेर पडणारे ठीक, मात्र असे घरात राहून मनात धुमसणारे कुणासाठीही जास्तीचे धोकादायक असतात हे येथे सांगण्याची गरज नसावी.


नाशकातही असे कमी नाहीत. भाजपातील निष्ठावंत तर यात आहेतच, शिवाय पर पक्षातून येऊन भाजपात स्थिरावू न शकलेलेही अनेकजण आहेत. भाजप भरात असताना आल्या आल्या पुत्रास उपमहापौरपद मिळवून घेणारे व पक्ष संघटनेत प्रदेश पातळीवर मिळालेल्या पदावर समाधान मानावे लागलेले स्वत: तर नाराज आहेतच, शिवाय त्यांच्यासमवेत आलेले व नगरसेवक म्हणून निवडून येऊनही पक्षात तसे दोन हात दूरच ठेवले गेलेले अनेकजण अस्वस्थ आहेत. महापालिकेत सत्ता असूनही काही हाती लागत नाही व पक्षात कुणी विचारत नाही अशी त्यांची गत आहे.


पक्ष मोठा होतो, विस्तारतो तेव्हा सर्वांनाच संधी देता येत नाही हे खरेच; परंतु निष्ठावंतांना डावलून जेव्हा बाहेरून आलेल्यांना डोक्यावर बसवले जाते तेव्हा त्यातून होणारा मनस्ताप अधिक जिव्हारी लागतो. भाजपात तेच झालेले दिसत आहे. पक्षाच्या पडतीच्या काळात खस्ता खाल्लेले आज वंचित ठरले आहेत. ज्येष्ठता व अनुभव पाहून संधी दिली जाण्याऐवजी राजकीय गणिते मांडून व वर्ग विशेषाची मर्जी राखण्यासाठी पदे दिली जात असल्याची सल अनेकांच्या मनात आहे. विशेषत: काही भगिनींनी निष्ठेने पक्षकार्यात आयुष्य वाहिले असताना ना नगरसेवकपद त्यांच्या वाट्याला आले, ना महिला मोर्चाचे अध्यक्षपद. युवा मोर्चाचे अध्यक्षपदही नवख्या उमेदवारास दिले गेले व अन्य प्रबळ दावेदारांना दुय्यम पदाच्या घुगºया खाऊ घातल्या गेल्या. इतके करूनही काही जणांचे अन्य पर्याय धुंडाळणे सुरूच आहे.


एकूणच भाजपात अंतस्थ अस्वस्थता मोठी आहे. खडसेंसोबत फार कुणी गेले नाही, त्यामुळे पक्षाला काही धक्का बसला नाही या आविर्भावात राहता येऊ नये. पक्षात राहूनही ऐनवेळी योग्य त्या पातळीवर धक्का देऊ शकणारे कमी नाहीत. भाजपचा दीर्घकाळ सहकारी राहिलेल्या शिवसेनेला याच नाशकात २००४च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आणून दिला गेलेला नाशिककरांनी पाहिला आहे. जनता सोबत असली आणि पक्षातील सहकारीच नाराज असले तर समोर दिसणाºया विजयाचेही पराजयात कसे रूपांतर होते हे तेव्हा दिसून आले होते. त्यामुळे पक्षातले धुमसलेपण दुर्लक्षून चालणारे नसते. खडसेंचे पक्ष सोडून जाणेही सहजपणे घेतले जाणार असेल तर त्यातून आत्मघातच ओढवावा. कारण अंतस्थपणे धुमसणारे कोणते दिन दाखवतील हे सांगता येऊ नये.

सर्वमान्य स्थानिक नेतृत्वाचा अभाव ...
नाशिक भाजपात अलीकडील सत्तेच्या अनुषंगाने अनेकांच्या नशिबी नेतृत्व आले असले तरी सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव दूर होऊ शकलेला नाही. बंडोपंत जोशी, डॉ. दौलतराव आहेर, गणपतराव काठे यांसारख्या ज्येष्ठ नेते मंडळींचा पक्षात दबदबा होता. असमंजसाच्या प्रसंगी मार्गदर्शन घ्यावे असे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचा शब्द अखेरचा व प्रमाण मानला जाई; पण आज त्यांच्यानंतर असे नेतृत्वच नाशकात नाही की ज्याचे सर्वजण ऐकून घेतील. दोन दोन टर्म आमदारक्या मिळवणारेही आहेत; परंतु तेदेखील आपल्या समर्थकांमध्येच गुंतल्याने सर्वमान्यता मिळवू शकलेले नाहीत.

Web Title: Khadse is gone; But the discomfort of those who have not gone is not less!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.