केळकर यांचे शास्त्रीय गायन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:28 IST2018-12-16T22:42:26+5:302018-12-17T00:28:51+5:30
पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कोठारी कन्या शाळेत दरमहा संगीत मैफलीत गायन सादर करताना केदार केळकर. समवेत तबल्यावर संगीत कुलकर्णी, संवादिनीवर सागर कुलकर्णी.
नाशिकरोड : पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
जेलरोडच्या कन्या कोठारी शाळेत झालेल्या दरमहा संगीत मैफलीत गायक केदार केळकर यांनी शुद्ध कल्याण रागात विलंबित ख्यालात एक तालात त्यांनी साधे सूर साधे रिझावे ही बंदिश सादर करत आलापांचे आविष्कार दाखविले. मध्य लयीत राग बिहागमध्ये त्यांनी पंडित सी. आर. व्यासांची ले जा रे पथिक वा ही बंदिश सादर केली. मध्य एक तालात सुरतीया यू देखी अशी अप्रतिम बंदिश सादर केली. बागेश्री रागात संगीत सौभद्र नाटकातील बहुत दिन नच भेटलो सुंदरीला हे नाट्यपद समर्थपणे सादर केल्याने कुमार गंधर्वांच्या गायकीची अनुभूती आली. संवादिनीवर सागर कुलकर्णी व तबल्यावर संगीत कुलकर्णी यांनी साथ दिली.
यावेळी पंडित शंकर वैरागकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत एकून नियमित रियाज केला पाहिजे. आदत, जिगर और हिसाब असेल तर गायन वेगळ्या उंचीवर जाते. कष्ट केले तर फळ हे निश्चित मिळते असे पंडित शंकर वैरागकर यांनी सांगितले.
गायक व पाहुण्यांचा परिचय शुभांगी देवधर यांनी करून दिला. आभार प्रफुल्ल कुलकर्णी यांनी मानले. गोपाळ सौंदाने आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील देवधर, आत्माराम हगवणे, उध्दव हांडोरे, शरद शिंदे, चंद्रकांत लोंढे, शिवाजी पैठणकर, किशोर चव्हाण, ओंकार वैरागकर, सरिता वैरागकर, पी. व्ही. जोशी, श्रीकांत कुलकर्णी, ओम ढेमसे, एच. बी. कुंटे, एस. पी. ठाकूर, श्रुती बोरसे, समृद्धी गांगुर्डे आदी उपस्थित होते.