देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.
By Admin | Updated: January 18, 2015 01:55 IST2015-01-18T01:54:52+5:302015-01-18T01:55:22+5:30
देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.

देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.
नाशिक : आपण ज्या देशात व ज्या शहरात राहतो त्या देशाच्या आणि शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे. तसेच सदैव प्रामाणिकपणे देशभक्ती जोपासण्याची शिकवण प्रेषित पैगंबरांनी दिली आहे. त्यांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत या शांतताप्रिय धर्मनिरपेक्ष भारताच्या विकासासाठी दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने योगदान देऊन राष्ट्राला बळकट करावे, असे आवाहन समाजाचे ५३वे धर्मगुरू सय्यदना आलीकद्र मुफद्दल सैफुद्दीन यांनी शहरात केले.
टाकळीरोड परिसरातील बद्री वसतिगृहाच्या आवारात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सय्यदना सैफुद्दीन प्रमुख अतिथी म्हणून उपदेश करत होते. यावेळी सय्यदना म्हणाले, मानवाने पृथ्वीतलावर उत्कृष्ट पद्धतीची आदर्श जीवनशैलीचा अवलंब करावा, म्हणून अल्लाहने प्रेषित पैगंबरांना (रसूल) पाठविले. इस्लाम धर्म व या धर्माच्या प्रेषितांनी नेहमीच शांतता, मानवता व सदाचाराची शिकवण जगाला दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहून देशात किंबहुना पृथ्वीवर शांतता व एकता टिकवून ठेवण्यामध्ये योगदान द्यावे. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक अर्चना थोरात, सचिन मराठे आदि मान्यवर उपस्थित होते. टाकळीफाटा येथील बोहरा समाजाच्या कुतुबी मशिदीचे मुख्य इमाम अमील अदनान भाई यांनी सय्यदना यांचे स्वागत करत मोठ्या आदराने त्यांना व्यासपीठावर आणले. व्यासपीठाच्या रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने सय्यदना यांना अभिवादन करत होते व सय्यदना यांनीदेखील समाजबांधवांच्या दिशेने हात उंचावून हळुवारपणे मार्गस्थ होत आशीर्वाद दिले. मुर्तडक व फरांदे यांनी नाशिककरांच्या वतीने सय्यदना यांचे शहरात स्वागत केले. (प्रतिनिधी)