घोडा तहानलेला ठेवा, तो पाण्यापाशी जाईलच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:28 AM2024-04-16T06:28:11+5:302024-04-16T06:29:20+5:30

भारतीय तरुणांना ई-मेलला अटॅचमेंट करणे, संगणकातील मजकूर कॉपी-पेस्ट करणे, अगदी साधे एक्सेल शीट वापरता येत नाही; हा तपशील लज्जास्पद होय!

Keep the horse thirsty, he will go to water | घोडा तहानलेला ठेवा, तो पाण्यापाशी जाईलच! 

घोडा तहानलेला ठेवा, तो पाण्यापाशी जाईलच! 

डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक

भारतातील तरुणांमधील कौशल्य, बेरोजगारी व त्यांच्या नोकऱ्यांसंबंधीचे भवितव्य याविषयीचे वास्तव मांडणारा ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’चा ‘इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४’ नुकताच प्रसिद्ध झाला.  मोबाइलमध्ये दिवसाचे सात-आठ तास अडकून पडलेल्या तरुणांनी हा ३४० पानांचा अहवाल वाचला असण्याची शक्यता कमीच.  पदवी घेऊन घरीच बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी; तसेच त्यांच्या पालकांसाठी या अहवालाचे वास्तव नियोजनाचा पुढचा कृती आराखडा ठरविण्यासाठी उपयोगी पडेल. ज्या शाळा व महाविद्यालयांतून बेरोजगार तरुणांची ही फौज निर्माण होत आहे तेथील शिक्षक व प्राध्यापकांनीही आपलेसुद्धा याप्रश्नी काही सामाजिक उत्तरदायित्व आहे, या भावनेतून या अहवालाकडे पाहिले पाहिजे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षितांचे २००० मध्ये असलेले बेरोजगारीचे ३५.२ टक्के इतके  प्रमाण २०२२ मध्ये ६५.७ टक्के  झाले आहे. देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या बेरोजगारांत  ८३ टक्के हे तरुण आहेत. २०२३ पर्यंत खासगी क्षेत्राकडून ३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा असताना प्रत्यक्षात १.०७ लाख कोटी इतकी कमी गुंतवणूक झाल्याने ११ लाख ५० हजारांऐवजी केवळ ४ लाख ९५ हजार इतकेच रोजगार निर्माण झाले.

देशातील ७५ टक्के तरुणांना ई-मेलला अटॅचमेंट कशी करतात हे माहीत नाही. ६० टक्के तरुणांना संगणकातील मजकूर कॉपी-पेस्ट करता येत नाही, तर ९० टक्के तरुणांना एक्सेल शीटच्या माध्यमातून अगदी सामान्य गणिती समीकरण सोडविता येत नाही. वरकरणी या आकडेवारीवर विश्वास बसत नाही, हे खरेच! कारण ज्याच्या हाती मोबाइल, तो ‘स्मार्ट’ ही आपली सरसकट समजूत! अविश्वास दाखवून हा अहवालच झुगारता येऊ शकेल; पण  त्यामुळे वास्तव बदलणार नाही.   

गेल्या एक-दोन दशकांपासून ऊठसूट जो तो भारत हा ‘तरुणांचा देश आहे’, याचा उद्घोष करीत असतो. ते खरेही आहे. २०३६ पर्यंत भारतातील तरुणांचे वय आजच्या २७ टक्क्यांवरून २३ टक्क्यांपर्यंत खाली आलेले असेल म्हणजे आता हळूहळू आपला देश म्हातारपणाकडे वाटचाल करील; पण अजून किमान एक दशक तरी आपण तरुण देश म्हणून मिरवू शकणार आहोत; पण खरा प्रश्न केवळ तरुण असण्याचा नाही, तर आपण कौशल्याधारित, उत्पादनक्षम व रोजगारनिर्मिती करणारा तरुण देश आहोत की, ८३ टक्के बेरोजगार तरुण असलेला देश आहोत हा आहे. कौशल्यांचा अभाव असलेला, उत्पादनक्षम नसलेला, बेरोजगार असलेला तरुण देश ही अवस्था  भूषणास्पद नव्हे! त्यामुळेच आभासी विश्वातून आणि भ्रामक स्वप्नरंजनातून बाहेर पडून आजच्या तरुणांना, पालकांना व शिक्षकांना या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहावे लागेल. 

देशातील जे २० टक्के तरुण स्वयंप्रेरित आहेत, वेळ वाया न घालविता कौशल्य विकास व ज्ञानवृद्धीसाठी झगडत आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत आपला विकास साधतीलच. प्रश्न उरलेल्या ८० टक्क्यांचा आहे. या ८० टक्के तरुणांना आपण कशासाठी जगतो आहोत, याचे भान शालेय पातळीपासून निर्माण करणे हे आजचे आव्हान आहे. शाळेच्या ज्या दप्तरात वह्या, पुस्तके व जेवणाचा डबा असायला हवा, त्या दप्तरात चाकू, सुरे, कोयते व शस्त्रे सापडू लागली आहेत. याचे कारण हेच आहे की, आपल्या मुलांना कशासाठी जगायचे, आयुष्याचा अर्थ काय हे कळलेले नाही. त्यासाठी देशव्यापी कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. घोड्याला पाण्याजवळ न नेता त्याला उपाशी व तहानलेला ठेवून तोच पाण्यापाशी कसा जाईल, अशी परिस्थिती घरात निर्माण करावी लागेल. 

तसे अभ्यासक्रम आखावे लागतील. राजकीय इच्छाशक्ती पणाला लावावी लागेल. सध्याच्या उन्मादी वातावरणात हे भान वरून खाली येण्याची शक्यता कमी असल्याने आता घरातूनच म्हणजे खालून वर जाण्याचा मार्ग पत्करणे जास्त परिणामकारक ठरेल. 

कुणाही तरुणाला किमान २ ते ३ कौशल्ये आल्याशिवाय पदवी देता येणार नाही, अशी नवीन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. या कौशल्यांचे मूल्यमापन आता शाळा व महाविद्यालयांनी नव्हे, उद्योगधंद्यांनी म्हणजे इंडस्ट्रीने करावे. शाळा-महाविद्यालयांनी मूलभूत ज्ञानाचे व इंडस्ट्रीने कौशल्याचे अशी द्विस्तरीय मूल्यमापनाची पद्धत व या दोहोंत उत्तीर्ण झाल्यास पदवी अशी व्यवस्था वा शिक्षणपद्धती आणल्यास युवक ‘एम्प्लॉएबल’ होऊ शकतील. इंडस्ट्रीलाही कुशल मनुष्यबळ हवे असेल, तर कौशल्य शिकविणे व त्याचे मूल्यमापन करणे यात योगदान देणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम हे ५० टक्के मूलभूत व ५० टक्के कौशल्यावर आधारित केले तरीही परिस्थिती बदलण्यास मदत होईल. 

शालेय अभ्यासक्रमात किमान ५० टक्के अभ्यासक्रम हा जीवन कशासाठी जगायचे, भाषेवर प्रभुत्व कसे मिळवायचे, कल्पनाशक्ती, नावीन्यता व सर्जनशीलता कशी वाढवायची, जीवन जगण्यासाठी लागणारी जीवनकौशल्ये म्हणजे लाइफ स्किल्स कशी वाढवायची यासंबंधीचे असले म्हणजे बालपणापासून कौशल्यांकडे कल वाढेल. नवीन रोजगारनिर्मिती, रोजगारांचा दर्जा वाढविणे, कौशल्य शिक्षणावर भर देणे, उद्योगधंद्यांना आवश्यक असे ज्ञानाधारित, अर्थव्यवस्थेशी संलग्न अभ्यासक्रम शिकविणे यांसारख्या उपाययोजनांनीच हा गंभीर प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. - sunilkute66@gmail.com

Web Title: Keep the horse thirsty, he will go to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.