कवी कट्ट्यावर २३ तास काव्यरस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:17+5:302021-02-05T05:45:17+5:30
नाशिक : साहित्य संमेलनातील सर्वाधिक चर्चित भाग असलेल्या कवी कट्ट्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, नाशिकला कवी कट्ट्यावर ...

कवी कट्ट्यावर २३ तास काव्यरस!
नाशिक : साहित्य संमेलनातील सर्वाधिक चर्चित भाग असलेल्या कवी कट्ट्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, नाशिकला कवी कट्ट्यावर होणारे कविसंमेलन तब्बल २३ तास रंगणार आहे. त्यात राज्य आणि राज्याबाहेरील ४५० कवी त्यांच्या एकमेव कवितेचे सादरीकरण करणार आहेत.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बोलीभाषेतील कवींचादेखील त्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच काव्यातील ग्रामीण, नागरी, सामाजिक, दलीत, बोली, गझल, छंदोबध्द, मुक्तछंद आणि अन्य सर्व काव्यप्रकारांचाही त्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. या कवीकट्ट्यासाठी पुण्याचे राजन लाखे, नाशिकचे शंकर बोऱ्हाडे आणि संतोष वाटपाडे तसेच बडोद्याचे प्रसाद देशपांडे यांचा समावेश करण्यात आला असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी कळविले आहे. या कवी कट्ट्यावरील सादरीकरणासाठी कविता स्वरचित असावी, २० ओळींपेक्षा मोठी नसावी, कविता निवड समिती करेल, कवितेचे सादरीकरण ३ मिनिटात करणे बंधनकारक असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींचे पालन केल्यासच कविता सादरीकरणाला परवानगी देण्यात येणार आहे.
इन्फो
नवकवींना व्यासपीठाची आस
नुकताच एखाद-दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेल्या नवकवींसाठी साहित्य संमेलनातील कवीकट्टा हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ असते. या कवीकट्ट्यावर कुणाची कविता नावाजली गेली, तर त्या कवीचे नाव लवकरच राज्यभरात गाजू लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नाशिकच्या या कवी कट्ट्यावर कोणत्या कवीला विशेष दाद मिळते, त्याचीदेखील रसिकांना उत्सुकता राहणार आहे.
इन्फो
निमंत्रितांच्या यादीची महामंडळाकडून निश्चिती
साहित्य संमेलनात जे मुख्य कविसंमेलन रंगते, त्यासाठी राज्यातील केवळ मोजक्या ज्येष्ठ श्रेष्ठ कवींनाच निमंत्रित केले जाते. या कवींमध्ये कुणाची निवड करायची, कुणाला निमंत्रण द्यायचे त्याचे सर्वाधिकार संपूर्णपणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे असतात. त्यामुळे त्या निमंत्रित कवींमध्ये कुणाचा अंतर्भाव असेल, त्याबाबतची यादी निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या निमंत्रित कवींची नावे निश्चित होणार, ते महामंडळाकडून जाहीर झाल्यानंतरच समजू शकणार आहे.