काश्मीरप्रश्नी केंद्राची विशेष रणनीती
By Admin | Updated: April 30, 2017 01:52 IST2017-04-30T01:52:16+5:302017-04-30T01:52:27+5:30
नाशिक : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणाऱ्या हिंसाचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे

काश्मीरप्रश्नी केंद्राची विशेष रणनीती
नाशिक : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणाऱ्या हिंसाचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे. गेल्या ६० वर्षांत त्यांना भारतीय सैन्याशी समोरासमोर लढणे शक्य होत नसल्याने अशाप्रकारे काश्मिरी तरुण-तरुणींची दिशाभूल करून माथे भडकविण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. परंतु, यात त्यांना कधीही यश प्राप्त होणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार विशेष रणनीती तयार करीत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.
भारतीय माजी सैनिक संघाच्या नाशिक शाखेतर्फे येथील स्वामी नारायण स्कूलमध्ये आयोजित राष्ट्रस्तरीय माजी सैनिक अधिवेशनात सुभाष भामरे बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार, निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. एन. पाटील, ग्रुप कॅप्टन पाठक आदि उपस्थित होते. भामरे म्हणाले, काश्मीरमध्ये विविध कारणांनी रस्त्यावर उतरून दगडफेक, घोषणाबाजी करणारे तरुण- तरुणी आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांना नुकसान पोहोचवून खोऱ्यात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यांना भडकवणाऱ्यांचे समूळ उच्चाटन आवश्यक असून, त्यासाठी सरकार विशेष रणनीती तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)