कसाऱ्याच्या युवकाची उपनगरजवळ हत्या
By Admin | Updated: May 26, 2017 00:37 IST2017-05-26T00:36:59+5:302017-05-26T00:37:12+5:30
नाशिकरोड : उपनगर-जेलरोड कॅनॉल रस्त्यालगत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मोटारी व दुचाकीवरून येत हर्ष सोसायटीच्या वाहनतळामध्ये गोळीबार केला.

कसाऱ्याच्या युवकाची उपनगरजवळ हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : उपनगर-जेलरोड कॅनॉल रस्त्यालगत असलेल्या मंगलमूर्तीनगर परिसरात भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मोटारी व दुचाकीवरून येत हर्ष सोसायटीच्या वाहनतळामध्ये गोळीबार केला. यावेळी वाहनतळात बसलेल्या तुषार भास्कर साबळे (१६) या मुलावर धारधार शस्त्राने हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२५) उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगलमूर्तीनगर मधील हर्ष अपार्टमेंट, जय प्रभाकर अपार्टमेंट, जयश्री निवास अपार्टमेंटसह अशा पाच ते सहा अपार्टमेंटचा हा संपूर्ण परिसर आहे. चारही बाजूंनी रहिवासी अपार्टमेंट असलेल्या या परिसरात येण्यासाठी दोन रस्ते आहेत.
या रस्त्यांवरून हल्लेखोरांनी तीन मोटारी व दोन ते तीन दुचाकींवरून चेहऱ्याला रुमाल बांधून प्रवेश केला. यावेळी हर्ष अपार्टमेंटच्या वाहनतळातून घरात जाणारे अक्षय जाधव व तुषार यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. हवेत गोळ्या झाडल्यामुळे दोघांनी पळ काढण्यास सुरुवात केली, यावेळी अक्षय जिन्याने व तुषार अपार्टमेंटच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत पळाला; मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून तुषारला गाठले, तर काहींनी अपार्टमेंटच्या अन्य घरांची दरवाजे बाहेरून बंद करून घेतले. हल्लेखोरांनी तुषारवर धारधार शस्त्राने मोकळ्या जागेत पाठीवर, मानेवर वार करून जबर जखमी केले. या हल्ल्यात तुषारचा मृत्यू झाला. आरडाओरड व पळापळ झाल्यामुळे आजूबाजूंचे रहिवासी बाल्कनी व खिडक्यांमध्ये आले; मात्र हल्लेखारोंनी हवेत गोळ्या झाडल्याने सर्व अपार्टमेंटच्या परिसरात सन्नाटा पसरला आणि नागरिक भीतीपोटी पुन्हा घरात गेले. यामुळे हल्लेखोरांना या अपार्टमेंटच्या परिसरातून तुषारच्या हत्येनंतर सहज पळ काढता आला. हल्लेखारांची वाहने मोकळ्या मैदानातून उपनगर कॅनॉलरोडच्या झोपडपट्टीमार्गे गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनी सांगितले.