कळवण नगरपंचायतीने कसली कंबर
By Admin | Updated: March 26, 2017 23:43 IST2017-03-26T23:42:51+5:302017-03-26T23:43:07+5:30
कळवण : कळवण नगरपंचायतीने शहरातील मुख्य रस्ते व चौकांत ४०१ थकबाकीदारांच्या नावांची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले आहे.

कळवण नगरपंचायतीने कसली कंबर
कळवण : कळवण नगरपंचायतीने शहरातील मुख्य रस्ते व चौकांत मोठमोठ्या ४०१ थकबाकीदारांच्या नावांची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले आहे. थकबाकी वसुली करण्यात कळवण नगरपंचायतीला यश मिळत असून, दि. २५ मार्चअखेर ५० टक्के घरपट्टी वसूल झाली. तीन ते चार दिवसांपासून सरासरी तीन ते चार लाख रु पयांची थकबाकी वसूल होत असल्याची माहिती देण्यात आली. घरपट्टी वसुलीनंतर पाणीपट्टी वसुलीकडे कळवण नगरपंचायत मोर्चा वळवणार असून, थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ . सचिन पटेल यांनी दिली. थकबाकीदारांच्या यादीत मोबाइल टॉवरदेखील असून, नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून मोबाइल टॉवरही सील करण्यात आल्याने संबंधित मोबाईल रेंज गायब झाली आहे. नवीन व जुनी थकबाकी १ कोटी ६ लाख रु पयांपैकी ५०टक्के रक्कम नगरपंचायत खाते जमा झाली असून , नगरपंचायत निवडणुकीत १३ टक्के थकबाकीदारांकडून थकीत रक्कम वसूल झाली होती. वर्षभरात नगरपंचायतकडून विविध दाखले मागणीसाठी येणार्या थकबाकीदारांना नगरपंचायतने दाखले देण्यास आडकाठी निर्माण केल्याने परिणामी थकबाकीदारांकडून थकबाकीचा भरणा झाल्याने गेल्या वर्षभरात नगरपंचायतकडून ५० टक्के थकबाकी वसूल झाली असून १००टक्के थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आदेश सरकारने दिले असल्याने वसुली तीव्र करण्यात आली आहे. वसुलीसाठी कसरत डोक्यावर असलेल्या १ कोटी ६ लाख रु पयांच्या करवसुलीचा डोंगर सर करण्यासाठी कळवण नगरपंचायतरने कंबर कसली आहे. त्यासाठी कर्मचारी करवसुली पथक तयार करण्यात आले आहे. मुख्याधिकारी डॉ. पटेल यांच्या मार्गदर्शनात हे पथक ३१ मार्चपर्यंत करवसुली मोहीम राबविणार आहे. जुनी थकबाकी व चालू वर्षातील लाखोचा कर अशाप्रकारे २ कोटी ६ लाख रुपयांची करवसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सामान्य नागरिकांकडे कमी, मात्र धनाढ्यांसह शासकीय मालमत्ता, संस्था व कार्यालये, काही मोठ्या खासगी मालमत्ताधारकांकडे मोठी रक्कम थकबाकी आहे. कर वसुलीदरम्यान राजकीय अडसर येत असल्याने वसुलीचा हा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. हे जरी उघडसत्य असले तरी थकबाकीबाबत कोणीही काही बोलण्यास तयार नाही. याचाच परिणाम म्हणून कळवण नगरपंचायत करवसुलीचा आकडा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे कर वसुलीचा हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
कळवण नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर करवसुलीसाठी आणि नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच कळवणकरांनी सहकार्याची भूमिका घेतली तर काही थकबाकीदारांसह संस्था, शासकीय कार्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कळवण नगरपंचायत प्रशासनाने शहरातील काही मोठ्या थकबाकीदारांसह शासकीय मालमत्ताधारक मोठ्या थकबाकीदारांच्या नावाची यादी शहरातील चौकाचौकात प्रकाशित केल्याने कळवण शहरात खळबळ उडाली आहे. कळवण नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी मोहीम तीव्र करून थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)