कळवण व्यापारी महासंघाची मेन रोडच्या कामाबद्दल नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:26 IST2021-07-15T22:54:42+5:302021-07-16T00:26:52+5:30
कळवण : येथील मेन रोडच्या अवघ्या एक किलोमीटरचे काम गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून ठेकेदाराच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार कामाला सुरुवात होते, शासकीय यंत्रणेचा कुठलाही अंकुश नसल्याने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कळवणकर जनता वैतागली असून या कामाबद्दल ग्रामस्थांबरोबर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार नितीन पवार व सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांना निवेदन दिले.

विकास मिना यांना निवेदन देताना मोहनलाल संचेती, विलास शिरोडे, रंगनाथ देवघरे, दीपक महाजन, चंद्रकांत कोठावदे, किशोर कोठावदे, विनोद मालपुरे, कुमार रायते, खंडू मालपुरे, सागर खैरनार आदी.
कळवण : येथील मेन रोडच्या अवघ्या एक किलोमीटरचे काम गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून ठेकेदाराच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार कामाला सुरुवात होते, शासकीय यंत्रणेचा कुठलाही अंकुश नसल्याने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कळवणकर जनता वैतागली असून या कामाबद्दल ग्रामस्थांबरोबर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार नितीन पवार व सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांना निवेदन दिले.
याबाबत आमदार पवार यांनी सार्वजनिक बांधकाम कळवण विभागाकडे या रस्त्याचे नियंत्रण देण्याबाबत वरिष्ठ यंत्रणेला सूचना करून तात्काळ कामे पूर्ण करण्याची सूचना केली, तर सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुुक्रवारी (दि.१६) ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर कामाला गती देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळवण शहरातील मेन रोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याचे दुतर्फा काँक्रिटीकरण काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्याचे काम आठ, आठ दिवस बंद असते. मशिनरी उभी असते त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने कळवणकर जनतेला एकतर्फी वाहतुकीचा वैताग आला आहे. रस्त्यावर एकदा खड्डे केले की, १५ दिवस कुणीही ढुंकूनही पाहत नाही, त्यामुळे राम भरोसे चाललेल्या या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कधीही कामावर दिसून आली नसल्याने कामाला गती मिळाली नाही.
रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही तर कळवण शहरातील सर्व व्यावसायिक, शेतकरी, वाहनधारकांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, विलास शिरोडे, रंगनाथ देवघरे, दीपक महाजन, चंद्रकांत कोठावदे, किशोर कोठावदे, विनोद मालपुरे, कुमार रायते, खंडू मालपुरे, सागर खैरनार, कळवण व्यापारी महासंघ पदाधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते.