‘कालिदास’ हे पैसे कमवण्याचे साधन नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:19 IST2018-06-25T00:18:52+5:302018-06-25T00:19:09+5:30
महाकवी कालिदास कलामंदिरचे खासगीकरण करण्याचे घाटत आहे. मात्र खासगीकरण झाल्यास या सांस्कृतिक ठेव्याला व्यावसायिक स्वरूप येईल.

‘कालिदास’ हे पैसे कमवण्याचे साधन नव्हे!
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे खासगीकरण करण्याचे घाटत आहे. मात्र खासगीकरण झाल्यास या सांस्कृतिक ठेव्याला व्यावसायिक स्वरूप येईल. दर वाढतील, प्रेक्षक दुरावतील त्यामुळे महापालिकेकडेच त्याचे व्यवस्थापन असावे. त्यात जास्तीची शिस्त आणावी, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रातूनही व्यक्त होत आहे. कालिदास कलामंदिरकडे महापालिकेने आर्थिक स्रोत म्हणून पाहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
कालिदास कलामंदिरसह शहरातील महापालिकेच्या अनेक संस्थांचे खासगीकरण करण्याचे प्रस्ताव अनेकदा आले आणि गेले. त्याची वास्तविकता अव्यवहार्य असल्याचेच अनेकदा दिसून आले. खासगीकरणामुळे कालिदास कलामंदिरचे दर अव्वाच्या सव्वा वाढतील. महापालिकेने त्याकडे आर्थिक फायद्याच्याच रूपात पाहू नये. जनतेप्रती काहीतरी जबाबदारी आहे हेही लक्षात घ्यावे. रंगकर्मी सध्या असेही आर्थिक संकटात आहेत त्यात ही भर नको.
- हेमलता पाटील, नगरसेवक
कालिदास कलामंदिरचे खासगीकरण व्हायला नको. महापालिका ही काही कंपनी नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्याच बाबतीत बिझनेस पहाणे चुकीचे आहे. कालिदास कलामंदिर हे सांस्कृतिक वारशाचे ठिकाण आहे. त्याचे खासगीकरण केले तर तो टिकणार नाही. रंगकर्मींना परवडणार नाही. कलामंदिरने नाशिकच्या रंगकर्मींना विशेष सवलत दिली पाहिजे. कालिदास ही महापालिकेची बांधिलकी आहे आणि ती जपली पाहिजे. - अजय बोरस्ते, नगरसेवक