कादवाची गाळप क्षमता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:05 IST2019-07-05T00:03:52+5:302019-07-05T00:05:11+5:30
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे; मात्र कादवाच्या कमी गाळप क्षमतेमुळे सर्व ऊस गाळप करणे शक्य होत नाही. त्यामुळे कादवाने आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात अधिक क्षमतेने गाळप करणे शक्य होणार असून, यंदा ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४३व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन करताना संचालक बापूराव पडोळ. समवेत चेअरमन श्रीराम शेटे, संचालक मंडळ, अधिकारी व कामगार वर्ग.
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना सातत्याने चांगला भाव वेळेवर देत असल्याने कादवाला ऊस देण्यासाठी शेतकरी उत्सुक आहे; मात्र कादवाच्या कमी गाळप क्षमतेमुळे सर्व ऊस गाळप करणे शक्य होत नाही. त्यामुळे कादवाने आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात अधिक क्षमतेने गाळप करणे शक्य होणार असून, यंदा ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले.
नवीन बॉयलर उभारणी कामाचे पूजन चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते तर कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन संचालक बापूराव पडोळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी शेटे बोलत होते. त्यांनी सांगितले की, डिस्टिलरी इथेलॉन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे; मात्र त्यासाठी जास्त गाळप होण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील ऊस उत्पादक कादवाला ऊस देण्यास प्राधान्य देत आहे. कमी गाळपमुळे येणाऱ्या अडचणी पाहता गाळप कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभी करण्यात येत आहे. नव्याने बॉयलर, टर्बाइन व मिल उभारण्यात येत असून, त्याची कामे सुरू आहे. सदर कामे पूर्ण होत येत्या हंगामात अधिक गाळप होण्याची अपेक्षाही शेटे यांनी व्यक्त केली. यावेळी व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, संपतराव कोंड, बबनराव देशमुख, रघुनाथ जाधव, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ शिंदे, सचिव बाळासाहेब उगले, मुख्य अभियंता विजय खालकर, मुख्य औषधशास्त्रज्ञ सतीश भामरे, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ, स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके आदींसह अधिकारी, कामगार, ऊसतोड मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप धारराव यांनी आभार मानले.