फक्त जागेत बदल, आठवडे बाजार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:20 IST2021-03-16T22:17:03+5:302021-03-16T22:20:09+5:30
नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्व'भूमीवर आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देऊनही दरवेळेस भरणारा आठवडे बाजार आता फक्त जागा बदलवून समता मार्ग, भोंगळे रस्ता ते दहेगाव नाक्या पर्यंत भरू लागला आहे. त्यामुळे आठवडे बाजार बंदच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसून येत आहे.

शहरात कोरोना १९ या विषाणुने बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पाश्व'भूमीवर प्रशासनाने तातडीने कडक उपाय योजना करणे अत्यावश्यक झाले असल्याचे पत्र ग्रामीण रुग्णालयाचे डॉ रोहन बोरसे यांनी तालुका पातळीवरील प्रशासनास देऊन चार दिवस उलटून गेले आहे. अद्याप रिक्षाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत असलेल्या आवाहनापलीकडे ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. नांदगाव शहरातली शासकीय आरोग्य यंत्रणा दररोज ५० पेक्षाही अधिक नमुने तपासणीसाठी पाठवत असून, त्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नमुने संसर्गजन्य आढळून आले आहेत. शासनाने कोरोना प्रादुर्भाव शोध, चाचणी व उपचार या त्रिसूत्रीचा अंमल करण्याच्या कडक सूचना दिल्या नंतरही शहरातील अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात व त्या अनुषंगाने उपाय योजना करण्यात परिषद प्रशासनाने टोलवा टोलवी चालवली आहे. परिणामी बाजाराच्या गर्दीच्या ठिकाणी अनेकजण बिनधास्तपणे विना मास्कने फिरतांना दिसून येत आहेत.
ग्रामीण भागातही वाढला धोका
ग्रामीण भागातही पळाशी, सावरगांव, वेहेळगाव, बाणगाव, मल्हारवाडी, भालूर या गावात कोरोनाने पाय पसरवले आहेत. नागरिकांनी नियम पाळले पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे या बरोबरच प्रशासनाने लघु स्वरूपाचे कंटेनमेंट झोन, नजर ठेवणे आदी उपाय योजना सक्षमतेने करण्याची गरज निर्माण झाली आहे.