कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 23, 2015 00:47 IST2015-07-23T00:46:58+5:302015-07-23T00:47:10+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
नाशिक : संच मान्यता आॅनलाइन करून त्यामधील त्रुटी दूर कराव्यात, वाढीव मंजूर पदांना वेतन सुरू करावे, माहिती तंत्रज्ञानाचा विषय अनुदानित करावा अशा एक ना अनेक प्रलंबित मागण्या त्वरित शिक्षण मंत्रालयाने पूर्ण कराव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्याच्या कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून शासनाने अद्याप केवळ आश्वासनांची खैरात केली असून अंमलबजावणीकडे काणाडोळा केल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. आॅनलाइन संच मान्यतेमधील त्रुटीमुळे राज्यातील हजारो अनुदानित तुकड्या बंद होऊन अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मार्च २०१४ रोजी २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या एक हजार मंजूर पदांना एप्रिलअखेर वेतन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीची भावना असून पुढील महिन्यात राज्यभर विभागीय स्तरावर आंदोलने करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा शालिमार येथील नेहरू उद्यानापासून सुरू झाला. रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाविरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अनिल महाजन, रमेश शिंदे, तानाजी ढोली, राजेंद्र धनवटे आदि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन सादर केले.