युवक करताहेत श्रमदानातून जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:50 AM2018-06-12T00:50:44+5:302018-06-12T00:50:44+5:30

घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.

 Jubilee service for the youth | युवक करताहेत श्रमदानातून जलसेवा

युवक करताहेत श्रमदानातून जलसेवा

Next

नाशिक : घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार व रविवार या हक्काच्या सुटीच्या दिवशी नाशिकच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समस्त महाविद्यालयीन युवकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल अशाप्रकारचे कार्य उभे केले आहे.  पावसाचे घटत चाललेले प्रमाण व दर उन्हाळ्यात ग्रामीण भागात भेडसाविणाऱ्या पिण्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनपातळीवर आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु तरीही समस्या आजही आ वासून उभी असल्यामुळे शासनाच्या उपाययोजनांचे पितळ उघडे पडू लागल्याने जलसेवेच्या या कामात स्वयंसेवी संस्थांनाच उतरावे लागले आहे. नाशिकच्या महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येत सिनेअभिनेते आमिर खान यांच्या ‘पानी फाउंडेशन’च्या कार्यापासून प्रेरणा घेत ‘जलसमृद्धी अभियान’ ही स्वयंसेवी संस्था उभी केली. नाशिक शहरातील गुरूगोविंदसिंग, संदीप फाउंडेशन, आरवायके, बीवायके, के. के. वाघ, केटीएचएम, व्ही. एन. नाईक या महाविद्यालयात अकरावी, बारावी तसेच डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वत:ला ‘जलसेवे’शी बांधून घेतले. त्यासाठी त्यांनी जलसंधारण विभागाकडून अतितीव्र पाणीटंचाई भासत असलेल्या गावांची माहिती गोळा केली. त्यावेळी नाशिक-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसारा घाटाला लागून असलेल्या उमरावणे या पाड्याची निवड केली. चढ-उताराची जमीन, काही ठिकाणी खडकाळ भाग व पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही पाणी अडविण्याची कोणतीही सोय नसलेल्या उमरावणे पाड्यात पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास या महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला. त्यासाठी त्यांना शहापूरच्या जलसंधारण विभागाने तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन केले.  २०० ते २५० उंबरे असलेल्या या लहानशा पाड्यात राहणाºया आदिवासी ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे त्यांच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची निकड ओळखून ‘जलसमृद्धी अभियाना’तील युवकांनी महाविद्यालयाला सुट्या लागल्यानंतरच १० मेपासून ‘श्रमदानातून’ दर शनिवारी, रविवारी ‘जलसेवा’ हाती घेतली. उमरावणे गावात जावून गाठायचे, गावातील आदिवासींना अगोदर यात सुरुवातीला फक्त तरुणाईचा जोष, जल्लोष व नव्याची नवलाई वाटली, त्यामुळे त्यांनी अगोदर काहीसे नाराजीच्या भावनेतून तरुणांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले. परंतु दर आठवड्याला सलग दोन दिवस शेकडो महाविद्यालयीन तरुण जीन्सची पॅन्ट, महागड्या टी शर्टचा विचार न करता, हातात कुदळ-पावडे घेऊन मातीत माखून घेत असल्याचे पाहून स्थानिक आदिवासींनी स्वत:हून या कार्यात सहभाग नोंदविला.  पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत तरुणांची ‘जलसेवा’ सुरू राहणार असून, श्रमदानातून आतापावेतो मातीनाला बांध, दगडी बांध, नाला खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परिसरातून दगड-धोंडे गोळा करून उत्कृष्ट  दगडी बांध बांधण्यात आला आहे. आता या युवकांना प्रतीक्षा  आहे, पहिल्या पावसाची व त्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाºया नाल्याची !
साथी हाथ बढाना !
‘साथी हाथ बढाना’अशी साद घालत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सार्थक देवरे, प्रमोद पिटकर, माधुरी देवरे, बाळ कुलकर्णी, मुकुंद पानसे, मेधा पानसे, हर्शिता सूर्यवंशी, स्वप्नील सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, मोहित देवरे, केतकी पानसे, तुषार कोतकर, सोनाली कोतकर, अस्मिता कोतकर, गोरख चव्हाण, विशाल चव्हाण, ललित प्रसाद, किसन देवरे, मालती देवरे, संजय सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, प्रियंका मांडके, प्रियंका सूर्यवंशी, रामेश्वर ढापसे आदीं युवक-युवतींनी या श्रमदानातून ‘जलसेवा’ साधली आहे.

Web Title:  Jubilee service for the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी