आजी-माजी पालकमंत्र्यांची ‘खुशी-नाखुशी’
By Admin | Updated: September 13, 2015 23:06 IST2015-09-13T23:03:14+5:302015-09-13T23:06:38+5:30
श्रेयवाद : नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान

आजी-माजी पालकमंत्र्यांची ‘खुशी-नाखुशी’
नाशिक : सिंहस्थ महाकुंभपर्वणीला रामकुंड परिसरात गोदाघाटावर लक्षावधी भाविक गोदास्नान करत पुण्य पदरात पाडून घेत असताना रामकुंडाच्याच साक्षीने जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री प्रशासकीय नियोजनावरून एकमेकांना शाब्दिक स्नान घालण्यात व्यस्त होते. विद्यमान कुंभमेळामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासकीय नियोजनाला शंभर टक्के गुण देत ६० ते ७० लाख भाविक आल्याचा दावा केला, तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणतानाच पहिल्या पर्वणीला स्वत:सह नाशिककरांनी आवाज उठविल्यानेच दुसरी पर्वणी सुकर झाल्याचे श्रेय आपल्याकडे घेण्यास विसरले नाहीत.
पहिल्या पर्वणीला दि. २९ आॅगस्ट रोजी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्ताचा फटका भाविकांची संख्या घटण्यावर झाला. पोलिसांच्या बंदोबस्ताचे तीव्र पडसाद उमटले. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंगचे अडथळे निर्माण करतानाच अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आल्याने भाविकांना १५ ते २० कि.मी. पायपीट करत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. शहरात अघोषित संचारबंदीच लागू करण्यात आली होती. प्रसिद्धीमाध्यमांनी या अतिरेकी नियोजनावर सडकून टीका केली. त्यानंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ‘कुंभकर्फ्यू’ अशी त्याची संभावना केली होती. जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारवरही आयतीच चालून आलेली टीका करण्याची संधी भुजबळांनी गमावली नाही. भुजबळ यांनी जाहीर भाषणांतही या बंदोबस्ताची टर उडविली होती शिवाय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. प्रचंड टीका झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने फेरनियोजनावर भर दिला. महापर्वणीला ठिकठिकाणी असलेला बॅरिकेडिंगचा अडथळा दूर करताना भाविकांची पायपीटही कमी केली. त्यामुळे भाविकांचा ओघ वाढत गेला. महापर्वणीचे नियोजन यशस्वी झाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रामकुंडावर माध्यमांशी बोलताना नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. पहिल्या पर्वणीला झालेल्या चुका दुरुस्त केल्याने सर्व घाटांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. भाविकांची पायपीट कमी झाल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही माध्यमांशी संवाद साधताना फेरनियोजन चांगले झाले, परंतु तरीही आपण शंभर टक्के समाधानी नसल्याचे सांगितले. पहिल्या पर्वणीला पोलिसांची वागणूक चुकीचीच होती. त्यांनी भाविकांना त्रास देण्याचे पाप केले. कामचुकारपणा केला. भाविक येऊच नये, असेच त्यांनी नियोजन केले होते. त्याविरोधात सर्वांनी आवाज उठविला. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणून जुने-नवीन अधिकारी पाठविले. बॅरिकेडिंग हटविले. यापुढची पर्वणीही अशीच सुखकर होवो, अशी इच्छाही भुजबळांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांचे साठ लाख;
भुजबळांचे पंचवीस लाख
महापर्वणीला नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ६0 ते ७0 लाख भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यावर टिपणी करताना छगन भुजबळ यांनी महाजनांवर टीका करत २५ लाखांच्या आसपास भाविक असल्याचा अंदाज सांगितला. पालकमंत्री सूर मारतात, परंतु नंतर त्यांचे काम सारे बेसूर होते, अशी टीकाही भुजबळांनी केली.