जीवनात जिद्द, आत्मविश्वास महत्त्वाचा
By Admin | Updated: June 29, 2014 00:34 IST2014-06-28T22:59:45+5:302014-06-29T00:34:57+5:30
जीवनात जिद्द, आत्मविश्वास महत्त्वाचा

जीवनात जिद्द, आत्मविश्वास महत्त्वाचा
नाशिक : प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करायला हवे. शिक्षण घेताना अनेक अडथळे येतात, मात्र त्यावर मात करून पुढे जायला हवे. यासाठी जीवनात जिद्द आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी केले.
नाशिक नवनिर्मिती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता सेवा मंडळाचे संचालक गं. पां. माने तर, प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह होते.
यावेळी डॉ. पवार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न न पाहता आयएएस, आयपीएस आणि शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पहायला हवे. यासाठी प्रत्येकाचे ध्येय निश्चित असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात अतुल गुप्ता यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर विक्रांत माळवे यांनी ‘अभ्यासक्रम कसा निवडावा’ या विषयावर माहिती दिली. गं.पा.माने व चंदूलाल शाह यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, संस्थेच्या वतीने यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी निशिकांत पगारे, विलास गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बर्गे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष गणेश बाणाईतकर, उपाध्यक्ष संदीप धात्रक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे सल्लागार अॅड. अमोल घुगे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव नितीन कोळेकर यांनी आभार मानले. कल्पेश जैन, नीलेश परदेशी, राहुल वारुळे, भूषण अहिरे, सचिन
ताजणे, अॅड. हर्षल पुराणिक, बापू नागरे, श्याम पाठक आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमाप्रसंगी दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)