जवान रंगनाथ पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 22:44 IST2022-07-16T22:41:40+5:302022-07-16T22:44:39+5:30
सायखेडा : अनेक दिवसांनंतर दोन दिवसांनी मुलगा घरी येणार असल्याचा आनंद कुटुंब व्यक्त करीत असताना अचानक आपल्या मुलाला सीमेवर ...

जवान रंगनाथ पवार यांच्या मृतदेहाचे अखेरचे दर्शन घेताना पत्नी व कुटुंबीय.
सायखेडा : अनेक दिवसांनंतर दोन दिवसांनी मुलगा घरी येणार असल्याचा आनंद कुटुंब व्यक्त करीत असताना अचानक आपल्या मुलाला सीमेवर मरण आल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत येऊन धडकली आणि सर्वांचे डोळे पाणावले. निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील जवान रंगनाथ वामन पवार हे राजस्थानमधील बडणारे सीमेवर सेवा बजावत असताना अचानक छातीत कळ येऊन त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर महाजनपूर या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निफाड तालुक्यातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा मुलगा सूरज याने अग्निडाग दिला.
कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य, अशिक्षित आई-वडील, लहान भाऊ, बहीण यांना सांभाळण्याची जबाबदारी लहानपणी रंगनाथ यांच्यावर पडली. मात्र, शरीराने धिप्पाड, प्रचंड मेहनती, हुशार असल्यामुळे बारावी शिक्षण झाल्यानंतर लगेच शासकीय सेवेत संरक्षण दलात नोकरीला सुरुवात केली. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सेवा करीत हवालदार पदाला गवसणी घातली.
त्रिपुरा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, नागालँड, आसाम, राजस्थान या राज्यांतील सीमेवर देशसेवा केली. जवळपास तेवीस वर्षे सेवा केली. एक वर्षाने ते सेवानिवृत्त होणार होते, त्यानंतर घरी येऊन कुटुंबासोबत राहणार असल्याचे स्वप्न उराशी बाळगून असताना अचानक सीमेवर ड्यूटी करीत असताना छातीत दुखायला लागले आणि उपचार करण्याअगोदर त्यांना मरण आले.
त्यांचे पार्थिव राजस्थानवरून पुणे येथे विमानाने त्यानंतर शासकीय गाडीतून घरापर्यंत आणण्यात आले.
यावेळी जवानाचे भाऊ विलास, आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहीण, तसेच माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस सहायक निरीक्षक पी. वाय. कादरी, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, कमांडो धनंजय वीर, डॉ. सारिका डेर्ले, खंडू बोडके, जगन कुटे, दिगंबर गिते यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी निफाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.