‘जनस्थान’ला मतपत्रिका बाद होण्याचा धसका
By Admin | Updated: March 30, 2017 00:16 IST2017-03-30T00:16:01+5:302017-03-30T00:16:19+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालय निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उमेदवारांकडूनही प्रचाराचा जोर कायम असताना जनस्थान पॅनलला मात्र आपली मतपत्रिका बाद होण्याची भीती आहे.

‘जनस्थान’ला मतपत्रिका बाद होण्याचा धसका
नाशिक : सार्वजनिक वाचनालय निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उमेदवारांकडूनही प्रचाराचा जोर कायम असताना जनस्थान पॅनलला मात्र आपली मतपत्रिका बाद होण्याची भीती आहे. या निवडणूक प्रक्रियेत अठरा मते देणे आवश्यक असताना जनस्थान पॅनलला मात्र विरोधी पॅनलमधील दोन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. रविवारी (दि. २) होणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एक, उपाध्यक्ष पदासाठी दोन तर कार्यकारिणी मंडळासाठी पंधरा अशा अठरा उमेदवारांना मतदान केले नाही तर मतपत्रिका बाद होणार असल्याने जनस्थान पॅनलमधील उमेदवार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी विरोधी पॅनलमधील कुठल्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एक पॅनल पूर्ण होण्यासाठी अध्यक्ष पदासाठी एक, उपाध्यक्ष पदासाठी दोन आणि कार्यकारी मंडळासाठी १५ सदस्य होणे आवश्यक असताना जनस्थान पॅनल मात्र अध्यक्ष आणि एका उपाध्यक्षाशिवाय या निवडणूक रिंगणात उतरल्याचा त्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. आपली मतपत्रिका बाद होऊ नये यासाठी तसेच आपण दिलेल्या मताचा विनियोग व्हावा, यासाठी जनस्थान पॅनलला विरोधी पॅनलला मतदान करावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. जनस्थान पॅनलप्रमाणेच परिवर्तन पॅनललादेखील इतर उमेदवारांना मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. परिवर्तन पॅनल एका उपाध्यक्षांशिवाय आणि दहा कार्यकारी मंडळ सदस्यांशिवाय या निवडणूक रिंगणात उतरल्याने ही निवडणूक आणखीच रंगतदार होणार आहे. आपले मत सार्थकी लागावे यासाठी उमेदवार पॅनलमधील उमेदवारांना की अपक्ष उमेदवारांना मतदान करतात आणि यातून कोणाला ‘लॉटरी’ लागते याचे चित्र मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष असलेले दोन उपाध्यक्ष तर कार्यकारिणी मंडळासाठी चार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी पिवळ्या रंगाची, उपाध्यक्ष पदासाठी गुलाबी व कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. मतदानासाठी एकूण ७ बूथ लावण्यात येणार असून, यातील १ ते ३ क्रमांकांच्या बूथवर आजीव सभासदांच्या मतदानाची सोय करण्यात येणार आहे. तर ४ ते ७ क्रमांकांच्या बूथवर सर्वसाधारण सभासदांना मतदान करता येणार आहे. (प्रतिनिधी)
मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी
शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय हवामान खात्यातर्फेदेखील पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आल्याने नाशिकच्या तपमानात होणारी वाढ लक्षात घेता मतदानाच्या नियोजित वेळेपेक्षा संध्याकाळी पाच ते रात्री आठ अशी अतिरिक्त वेळ वाढवून देण्याची मागणी एका पॅनलकडून करण्यात आली असून, या आशयाचे पत्र गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडू शकत नाहीत, तसेच त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संध्याकाळी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
रविवारी होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने उमेदवारांच्या विविध शंकांचे निरसन व्हावे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी गुरुवारी (दि. ३०) दुपारी १२.३० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या मीटिंग हॉलमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी किमान पॅनल प्रमुखांनी तरी या बैठकीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याची माहिती भणगे यांनी दिली.
न्यायालयीन निकालाची
उत्सुकता कायम
४मुंबई उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांकडे वर्ग केलेल्या खटल्याचा युक्तिवाद सोमवारी (दि. २७) पूर्ण झाला असून, याप्रक रणी धर्मादाय आयुक्त गुरुवारी (दि. ३०) आपला अंतिम निकाल देणार आहेत. दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची बुधवारी (दि. २९) सुनावणी पूर्ण झाली असून, याप्रकरणी आता शनिवारी (दि. १) अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे.