जळगावफाटा-कुरडगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 17:37 IST2020-03-01T17:37:02+5:302020-03-01T17:37:36+5:30
निफाड : जळगाव फाटा ते कुरडगांव या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक प्रमोद शिंदे यांनी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगावफाटा-कुरडगाव रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते मात्र सद्यस्थितीत या रस्त्यावरील डांबरीकरण जागोजागी उखडले असून ठिकठिकाणी मोठे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. सदरचा रस्ता पाहिल्यावर या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. कुरडगाव येथून कांद्याचे ट्रॅक्टर, भाजीपाल्याच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते परंतु मोठी वाहने चालवणे सध्या जिकीरीचे झाले आहे. अनेकदा खड्डा चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघातही या रस्त्यावर घडले आहेत. जळगांव फाटा ते कुरडगांव रस्त्यालगतच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने या रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास वाहने चालवताना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. मागील वर्षी मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केल्याने कुरडगांव येथील एक महिला जखमी झाली होती. या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने कुरडगांव येथील नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.