गिरणा धरणात जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:05 IST2021-09-13T23:05:02+5:302021-09-13T23:05:48+5:30
मालेगाव : तालुक्यातील गिरणा धरणातील जलाशयावरील मासेमारी ठेका रद्द करून राज्य मत्स्य उद्योग विकास विभाग महामंडळाऐवजी नाशिकच्या जिल्हा मत्स्य ...

मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जलसमाधी आंदोलन करताना शेखर पगार व पदाधिकारी.
मालेगाव : तालुक्यातील गिरणा धरणातील जलाशयावरील मासेमारी ठेका रद्द करून राज्य मत्स्य उद्योग विकास विभाग महामंडळाऐवजी नाशिकच्या जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाकडे देण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली गिरणा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. १९६१ मध्ये गिरणा धरण पूर्ण करण्यात आले असून त्याच्या जलाशयात ३ हजार २९० हेक्टर जमिनीवरील १२ गावे विस्थापित झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणात मच्छीमार, भोईसमाज, आदिवासी व कोळी होते. १९६९ मध्ये जय दुर्गा मच्छीमार व्यावसायिक सहकारी संस्था स्थापन करून गिरणा धरणात स्थानिक मच्छीमार उदरनिर्वाह करीत आहेत. गिरणा धरणातील जलाशय मे ब्रिज फिशरीजला देण्यात आले आहे. तो रद्द करावा म्हणून याचिका टाकण्यात आली. मात्र, ठेका रद्द करण्यात आला नाही. हा ठेका कोणत्या नियमानुसार देण्यात आला. याची चौकशी करावी. त्यांनी पाण्यात रासायनिक द्रव्य टाकत असल्यामुळे मासे नष्ट होत आहेत. ठेकेदाराने परराज्यातून परप्रांतीय कामगार आणले आहेत, हे लोक स्थानिक मच्छीमारांवर अन्याय करीत आहेत. गिरणा जलाशयावरील संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनात शेखर पगार, विकास खेडकर, शुभम भदाणे, अर्जुन जावरे, दीपक भोई, योगेश गर्दे, उमेश पाटील, किसन भोई , छबू नाईक शिवाजी नाईक आदी सहभागी झाले होते.