700 अनाथ बालकांचे जैन संघटना घेणार पालकत्व; बीजेएसचा पुढाकार, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 08:17 IST2021-06-20T08:16:47+5:302021-06-20T08:17:01+5:30
नाशिक : कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक ...

700 अनाथ बालकांचे जैन संघटना घेणार पालकत्व; बीजेएसचा पुढाकार, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
नाशिक : कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणत त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या स्वप्नांना साकारण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय निश्चित करून ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे.
भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षांत एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे.
आता भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ.५ वी ते १२ वीपर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेण्याचे काम करत आहेत.
बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येणार असून, त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, आरोग्य सेवा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती बीजेएसचे राज्य प्रभारी नंदकिशोर साखला, प्रकल्प प्रमुख दीपक चोपडा यांनी दिली.
सदर प्रकल्पासाठी बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल पारख, यतिश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, गोटू चोरडिया, अमित बोरा, गौतम हिरण, रोशन टाटीया, संदीप ललवाणी, रवी चोपडा, अतुल आचलिया, पंकज साखला, लोकेश कटारिया, मनीष शहा, संतोष चोरडिया आदी कार्यरत आहेत. अधिक माहिती साठी ८८३०७४२८०८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.