'भोलानाथ' उरला पुस्तकात; नंदीबैलाची गुबू गुबू दुर्मिळ झाली, पिढीजात व्यवसायाला अवकळा आली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:26 PM2023-05-20T12:26:36+5:302023-05-20T12:27:03+5:30

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का ? हे बालगीत शाळांमध्ये आवडीने गायले जात असले तरी प्रत्यक्षात या भोलानाथला पाहणे बालकांनाही दुर्मिळ झाले आहे.

it's rare to find nandi in villages as well, a traditional business is on the verge of collapse | 'भोलानाथ' उरला पुस्तकात; नंदीबैलाची गुबू गुबू दुर्मिळ झाली, पिढीजात व्यवसायाला अवकळा आली!

'भोलानाथ' उरला पुस्तकात; नंदीबैलाची गुबू गुबू दुर्मिळ झाली, पिढीजात व्यवसायाला अवकळा आली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क / एस.आर.शिंदे

पेठ (जि नाशिक)- भल्या पहाटे कहाळी (पिपाणीचा) मंजूळ आवाजासोबत ढोलकीच्या तालावर आपल्या धन्याच्या इशाऱ्यावर मान हलवत मनोरंजन करणाऱ्या नंदीबैलाची गुबू गुबू बदलत्या जीवनशैलीमुळे दुर्मिळ झाली आहे.

सकाळच्या प्रहरी सूर्यनारायणाच्या साक्षीने दारासमोर ढोलकीच्या तालावर ठेका धरणारा नंदीबैल आणि तेवढ्याच कुशलतेने आपले भविष्य सांगणाऱ्या नंदीबैलाच्या गुबू गुबूचे स्वर कानी पडताच गावातील बालगोपाळांसह अबालवृद्ध घराबाहेर येऊन गर्दी करतांना दिसून येत. दारासमोर येऊन आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार करत नंदीबैलाकडून विविध हालचाली करून घेणारा नंदीबैल आता फक्त पुस्तकातच पहायला मिळतो.

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का ? हे बालगीत शाळांमध्ये आवडीने गायले जात असले तरी प्रत्यक्षात या भोलानाथला पाहणे बालकांनाही दुर्मिळ झाले आहे. बदलती जीवनशैली व वाढती महागाई यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय बंद पडत चालला असून जनतेची दातृत्वाची भावनाच संपत चालल्याने नंदीबैल व्यवसायाला अवकळा आली आहे. 

दिवाळीचा सण आटोपल्यावर नंदीबैल व्यावसायिक जवळपास सहा महिने घराबाहेर पडत असतात. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या उक्तीप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह ही मंडळी गावठाणच्या एका कोपऱ्यात उघड्यावर वास्तव्य करत असते. भल्या पहाटे ऊठून नंदीबैलावर झुल चढवून त्याला सजवण्यात येते. एका नंदीबैल बरोबर किमान तीन जण आवश्यक असतात. ढोलकीच्या तालावर नंदीबैल मान डोलवत मालकाच्या आवाजावर व हावभावानुसार मान डोलवत प्रतिसाद देत असतो. तर अनेक वेळा लहान मुलाच्या पोटावर पाय देऊन ऊभे राहण्यासारखे कसरतीचे खेळही तो करत असतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर मिळालेले धान्य व सुट्या पैशातून  कुटुंबाची गुजराण करण्याबरोबर दोन पैसे गाठीला बांधण्याकडेही या कुटुंबाचा कल असतो.

अनेक कुटुंबांचा हा पिढ्यानपिढ्या चालत असलेला पारंपारिक व्यवसाय असून केवळ संस्कृती जतन करण्यासाठी अनेक कुटुंबे हा व्यवसाय करत असल्याचे सांगतात. जनावरांना चारा, त्यांची देखभाल व कुटुंबाचा खर्च याचे आर्थिक गणित जुळवताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत असल्याचेही ते सांगतात.

Web Title: it's rare to find nandi in villages as well, a traditional business is on the verge of collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.