आयटी पार्कचा पांढरा हत्ती पोसण्याची हौस

By Admin | Updated: March 8, 2016 00:15 IST2016-03-08T00:14:59+5:302016-03-08T00:15:56+5:30

एमआयडीसीची उदासीनता : सरकारी दुर्लक्षित धोरण उद्योगांच्या मुळावर

IT Park's White Elephant Feeding | आयटी पार्कचा पांढरा हत्ती पोसण्याची हौस

आयटी पार्कचा पांढरा हत्ती पोसण्याची हौस

संजय पाठक नाशिक
सुमारे एक तपापूर्वी बांधण्यात आलेली आयटी पार्कची इमारत अधिकाऱ्यांच्या उदासीनेमुळे वापराविना पडून असल्याने सध्या इमारतीला अवकळा आली आहे. ज्या कोणी इच्छुकाने इमारत घेण्याचे प्रयत्न केले, त्याला नियमाच्या खिंडीत गाडून ही इमारत कशी वापरता येणार नाही याचाच प्रयत्न झारीतील शुक्राचार्य करीत आहेत. परिणामी इमारत भकास झाली तरी चालेल, परंतु उद्योजकांना देणार नाही, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
राज्यात माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा मुंबई-पुणेव्यतिरिक्त अन्य शहरांतही प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन (स्व.) प्रमोद महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु आजवर या इमारतीतील गाळे भाड्याने जात नाही की इमारत चालविण्यास घेतली जात नाही. त्याचे कारण पुन्हा महामंडळच आहे. या आयटी पार्कच्या इमारतीचा ताबा घेऊन तेथे गाळे सुरू करण्यासाठी अनेक कंपन्यांनी इच्छा दाखवली; परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून रेडीरेकनरनुसार म्हणजेच बाजारभावापेक्षा जास्त दराने गाळे देण्याची तयारी केल्याने गाळे कोण खरेदी करणार, असा प्रश्न आहे.
मध्यंतरी काही उद्योगांनी ही इमारत भाड्याने घेऊन ती चालविण्यासाठी देण्याची तयारी केली; मात्र त्याला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खो घातला. महामंडळाने इमारत भाड्याने देण्यासाठी निविदा मागविल्यानंतर त्यानुसार देकार अपेक्षित होते. या इमारतीच्या बांधकामासाठी ३ कोटी ४४ लाख रुपये खर्च आला आहे. त्यावर चिंतामणी एज्युटेक ही नाशिकचीच एक कंपनी ५ कोटी ७५ लाख रुपये या दराने इमारत चालविण्यास घेण्यास तयार होती. मात्र महामंडळाने या इमारतीच्या बांधकाम खर्चाच्या १८ टक्के व्याज आकारणी करून भाडे आकारण्याचा अजब फंडा काढला. त्यामुळे ३ कोटी ४४ लाख रुपयांवर १८ टक्के व्याज धरून ७ कोटी ७५ लाख रुपये आकारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. वास्तविक, एखादी इमारत जुनी झाली आणि देखभाल दुरुस्तीअभावी ती खराब होत चालली तर त्यानुसार घसारा म्हणून तिचे दर कमी करायला हवे, नाही तर किमान आहे ते दर तरी मान्य करावे; परंतु अवकळा आलेल्या इमारतीसाठी जादा दाम कोण देणार असा साधा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज या इमारतीची अवस्था बिकट आहे. वायरिंग निघत चालली आहे. रंग उडत असून जाळे जळमटे होत असल्याने कोणी इमारत नव्हे तर गाळा विकत घेतला तरी त्यालाच आधी खर्च करून व्यवस्था करावी लागेल. मात्र, त्याचा विचार न करता महामंडळ अव्यवहार्य विचार करून पांढरा हत्ती पोसण्याच्या तयारीत असतील तर उद्योजक तरी काय करणार? (प्रतिनिधी)

Web Title: IT Park's White Elephant Feeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.