आहेर याच्या कॉल रेकॉर्डमध्ये दडलंय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:15 IST2021-09-03T04:15:57+5:302021-09-03T04:15:57+5:30
वणी : राजकीय व्यक्तींबरोबर सलगी व राजकीय संरक्षणाचा आव आणून स्वतःचे ईप्सित साध्य करण्यासाठी बेकायदेशीर ...

आहेर याच्या कॉल रेकॉर्डमध्ये दडलंय काय?
वणी : राजकीय व्यक्तींबरोबर सलगी व राजकीय संरक्षणाचा आव आणून स्वतःचे ईप्सित साध्य करण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या राहुल आहेर याच्या कॉल रेकॉर्डमधून बऱ्याच बाबी उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार अनिल कदम या लोकप्रतिनिधींच्या नावाने कागदपत्रांचे बनावटीकरण प्रकरणात वणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या राहुल आहेर याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्याच्या भ्रमणध्वनीच्या कॉल रेकाॅर्डचा डाटा शोधल्यास तपासाच्या दिशेला आणखी चालना मिळेल, त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. राजकीय व्यक्तींबरोबर राहुल आहेर याची जवळीक लक्षात घेतल्यास त्याच्या प्रभावी संपर्क यंत्रणेचा अंदाज येतो. राहुल अशा व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर करत असावा, याचाही शोध घेतला जात आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला अथवा सामान्य व्यक्तीला जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांना भेटून समस्या सोडविण्यासाठी उंबरठे झिजवावे लागतात. प्रसंगी भेटही होत नाही. त्या तुलनेत राहुल आहेर याने निर्माण केलेला स्वत:चा प्रभाव हा गुन्हेगारी वृत्तीसाठी फोफावणारा असल्याची बाब पुढे आल्याने प्रश्नचिन्हांची मालिकाच तपास यंत्रणेसमोर आलेली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत राहुल आहेर याला पोलीस कोठडी देण्यात आली असल्याने या कालावधीतील तपासादरम्यान दिशासूचक गती पोलिसांना मिळण्याचे संकेत आहेत. राहुल याच्याकडून सखोल माहिती घेण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असून गेल्या काही कालावधीतील राहुलच्या भ्रमणध्वनीचा डाटा तपासल्यास या गुन्ह्याशी संबंधित पूरक माहिती उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.