सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित
By Admin | Updated: February 13, 2015 01:33 IST2015-02-13T01:33:16+5:302015-02-13T01:33:40+5:30
सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित

सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात कोट्यवधी लोक शहरात दाखल होणार असल्याने अंतर्गत वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेने शहरातील रहदारीच्या अशा सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित केले आहे. एकूण दहा चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात येणार असून, उर्वरित तीन सिग्नल्सही प्रस्तावित आहेत. सिग्नल्स उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्यात आॅगस्ट-सप्टेंबर २०१५ या दोन महिन्यांतील शाही पर्वणी काळात नाशकात कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. बाहेरून येणारी वाहने थेट शहरात दाखल होणार नसून त्यांच्यासाठी महापालिका हद्दीत आणि हद्दीबाहेर आठ ठिकाणी वाहनतळ उभारण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, शहरात रामघाटाकडे येण्यासाठी एसटी महामंडळाच्याच गाड्यांचा वापर भाविकांना करावा लागणार आहे. त्यासाठीही शहरातील मध्यवर्ती भागात बसथांबे निश्चित केले जात आहेत. त्याचबरोबर नाशिक शहरातील अंतर्गत वाहतुकीचेही नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीचाही ताण पडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस विभाग यांनी शहरातील काही चौकांचे सर्वेक्षण करत त्याठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत त्यासंबंधी काम सुरू होते. शहरात प्रामुख्याने पंचवटी परिसरावर वाहतुकीचा पडणारा मोठा ताण लक्षात घेता त्याठिकाणी नव्याने सिग्नल्स यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार पंचवटी भागात पाच, कॉलेजरोड भागात दोन, सिडको, सातपूर आणि गंगापूररोड याठिकाणी प्रत्येकी एक सिग्नल बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शहरात सध्या २२ ठिकाणी सिग्नल्स यंत्रणा बसविण्यात आलेली असून, त्यातील नाशिकरोडमधील शिवाजी चौकातील सिग्नल्स यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद स्थितीत आहे. नव्याने दहा ठिकाणी सिग्नल्स उभारणीकरिता महापालिकेला सुमारे एक कोटी रुपये खर्च येणार आहे. सदर सिग्नल्स हे स्वयंचलित सौर ऊर्जेवर चालणारे बसविण्यात येणार असून, त्याठिकाणी टायमर, एलईडी अशा आधुनिक तंत्राचाही वापर करण्यात येणार आहे. सध्या सात चौकांतील सिग्नल्स बसविण्याचे निश्चित झाले आहे, तर नांदूर नाका चौक, शरणपूररोडवरील जुन्या पोलीस आयुक्तालयाजवळील एचडीएफसी चौक आणि सातपूर येथील महेंद्रा सर्कल याठिकाणी सिग्नल्स यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. सात चौकांमध्ये सिग्नल्स यंत्रणा बसविण्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच कार्यादेश काढण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. बनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)