नाशिक : सध्या गाजत असलेल्या नाशिकमधील हनी ट्रॅपप्रकरणी ज्या अधिकारी आणि संबंधित हॉटेल व्यावसायिकाभोवती संशयाचे जाळे आहे त्यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणांची आता चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर महसूल विभागाने अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.हनी ट्रॅपप्रकरणी कोणतीही अधिकृत नोंद पोलिस किंवा शासकीय दरबारी नसली तरी यासंदर्भातील अनेक सुरस कथा बाहेर पडू लागल्या आहेत. यात केवळ अधिकाऱ्यांची नावे घेतली जात असली तरी अनेक विकासकांशी संबंधित जमीन व्यवहारांची कामे अलीकडील काळात वाढल्याचे सांगण्यात येते. नाशिकमध्ये केवळ शहरातच नव्हे, तर शहराभोवती ग्रामीण भागातील जमिनींना सोन्याचा भाव असल्याने बहुचर्चित ‘गोल्डन गँग’ या व्यवहारात माेठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची चर्चा आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाचा शासकीय अधिकारी हनी ट्रॅपप्रकरणी संशयात सापडल्यानंतर त्याच्याकडून काही जमीन व्यवहारांची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा आहे.
पोलिस ॲक्शन मोडवर...विरोधी पक्षांकडून हनी ट्रॅप प्रकरण लावून धरले जात असल्याने सरकारला किमान चौकशीची भूमिका पार पाडावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. गोपनीयरीत्या चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. नाशिक पोलिसांकडे कोणाची तक्रार नाही, त्यामुळे कार्यवाही होत नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत असले तरी दोन दिवस अगोदरच ठाणे येथील पोलिसांच्या पथकाने येऊन चौकशीचा भाग म्हणून त्या हॉटेलची झाडाझडती सुरू केल्याचे वृत्त आहे.
जमीन व्यवहाराची चौकशीसंबंधित हॉटेल व्यावसायिकाचा जमीन व्यवहाराचा पूर्वापार व्यवसाय असल्याने साहजिकच त्याच्या आणि त्याच्याशी संबंधित बिल्डर्सच्या व्यवहारांची चर्चा आहे. विशेषत: शर्तीच्या इनामी जमिनींची खरेदी , आदिवासी क्षेत्राच्या जमिनी बिगर आदिवासी करण्यासाठीच्या परवानग्या घेणे, असे व्यवहार यातून झाल्याचे सांगण्यात येते.