युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:01 IST2018-11-22T21:00:12+5:302018-11-22T21:01:00+5:30
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे.

युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध
नाशिक : ठाणे येथे शिवसैनिकांनी मुख्य वनसंरक्षक (भा.व.से) राजेंद्र कदम यांच्यावर शाई व राखफेकीच्या नावाखाली केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरूवारी (दि.२२) नाशिकवनविभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले.
अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ येथील रोपवनात आग लागून काही भाग जळीत झाला. त्याचा ठपका कदम यांच्यावर ठाणे येथील शिवसैनिकांनी ठेवत भ्याड हल्ला केल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांना वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कदम यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून दोषी हल्लेखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे वनपरिक्षेत्र अधिकाºयांसह वनरक्षक, वनपाल यांनी केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव उपवनसंरक्षक, पुर्व, पश्चिम कार्यालय, वनविकास महामंडळ आदि सर्व कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून गुरूवारी दिवसभर शासकिय कामकाज केल्याचे चित्र पहावयास मिळाले. लोकशाही पध्दतीने निवेदन देण्याचा अधिकार आहे; मात्र मोठ्या संख्येने जमाव घेऊन हल्ल्याच्या तयारीने जाणे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल आडे, सचिव भगवान ढाकरे, काषाध्यक्ष रविंद्र भोगे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून भ्याड हल्ला
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये शासकिय कामात अडथळा आणल्याचे कलम वगळण्याच आल्याचे निवेदनात म्हटले आहे. राजकिय दबावाखाली पोलिसांनी कामगिरी केल्याची चर्चा वनविभागात ऐकू येत आहे. या हल्ल्याच्या चौकशीमध्ये कुठल्याहीप्रकारचा राजकिय दबाव येता कामा नये, अशी मागणी निवेदनात केली आहे.