अनुवादातून संस्कृतीची ओळख
By Admin | Updated: March 26, 2016 22:54 IST2016-03-26T22:48:38+5:302016-03-26T22:54:13+5:30
श्रीपाल सबनीस : आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषिक संमेलनास प्रारंभ

अनुवादातून संस्कृतीची ओळख
त्र्यंबकेश्वर : माणसांना माणुसपण टिकवायचे असेल तर एका देशाची संस्कृती दुसऱ्या देशाशी जुळविण्यासाठी आदान-प्रदान केवळ भाषिक अनुवादातूनच करता येईल. भारत बहुभाषिक देश आहे. प्रत्येक राज्यातील संस्कृती, अस्मिता वेगवेगळी आहे. अनुवादातून त्या संस्कृतीची ओळख होऊ शकते, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषिक साहित्य ंसंमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी सबनीस म्हणाले केवळ अनुवादावरच न थांबता प्रत्यक्ष भाषेद्वारे व्यवहारातदेखील उपयोग झाला पाहिजे. आजच्या तरुण पिढीबद्दल बोलताना ते म्हणाले, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारी संस्कृती कुठे चालली आहे. आजचा तरुण पुरुषार्थ बलात्कारामध्ये खर्च करीत आहे. हा संस्कृतीचा विकास आहे की ऱ्हास आहे याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. जगात शांतता नांदली पाहिजे. अहिंसेच्या मुद्द्यावर भगवान बुद्धांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. अन्यथा हा संस्कृतीचा पराभव मानावा. भाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल तर अनुवादाचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरण, दक्षिण कोरीयाने तयार केलेल्या हायड्रोजन बॉम्बचे प्रकरण, महात्मा गांधींचा वारसा सांगणारे खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद गांधींचा दाखला, संस्कृतीबद्दल बोलताना संगीत क्षेत्राचाही ऊहापोह केला ते म्हणाले, संगीत-नृत्य ही संगीताची-कलेची संस्कृती जगभर सारखी असली तरी प्रकार वेगवेगळे असतात. पं. रविशंकर यांची सतार भारतातच वाजते, परदेशातदेखील त्यांची सतार तेच संगीत ऐकविणार, अमृता खानविलकर देशात नाचते, परदेशातही नाचते. संगीत-नृत्य आदिंची कला भाषिक-अनुवादानेच समजून घेता येते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागतगीताने करण्यात आला. परंपरेप्रमाणे सरस्वतीपूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य बापूसाहेब देसाई यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. यावेळी हिंदी, मराठी, बेंगाली, संस्कृत व इंग्लिश भाषेचे प्रतिनिधी म्हणून पाच विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषेतून संवाद साधला.
या कार्यक्रमासाठी स्व. परिघादेवी दिनकरराव पानगव्हाणे व्यासपीठावर इंडो-जपान इंटरनॅशनल रिसर्च फाउण्डेशन, जपान-योकोहामो-शी-जपानच्या श्रीमती राजकुमारी गौतम, निदेशक आय.एम.सी. बँक नाशिकचे अशोक सोनवणे, लँबरसार्ट, फ्रान्सचे लुईस व्हास्ट प्रोन्ही, डॉ. विद्या चिटको, व्हर्जिनिया, अमेरिका आदि मान्यवरांसह प्राचार्य चंद्रशेखर पाटील, प्रा.डॉ. घन:श्याम वडोळे, प्रा. निखाडे, प्रा. शिरसाठ आदि उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य बापूराव देसाईलिखित विख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रीय जननायक : अॅड. उज्ज्वल निकम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. (वार्ताहर)