Interviews of trustees for Sant Nivruttinath Sansthan postponed | संत निवृत्तीनाथ संस्थानसाठी विश्वस्तांच्या मुलाखती स्थगित

संत निवृत्तीनाथ संस्थानसाठी विश्वस्तांच्या मुलाखती स्थगित

ठळक मुद्देविश्वस्त पदाची निवड पुन्हा एकदा लांबली

त्र्यंबकेश्वर : येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हा मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विश्वस्त पदाची निवड पुन्हा एकदा लांबली आहे.

गेल्या वर्षभरापासून संस्थानच्या विश्वस्त पदाची निवड प्रक्रिया या ना त्या कारणाने खोळंबली आहे. मार्च २०२० मध्येच विश्वस्त पदाची मुदत संपुष्टात आली होती. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने धर्मादाय आयुक्तांनी मागील विश्वस्त मंडळालाच मुदतवाढ दिली होती. त्यानंतर नव्याने विश्वस्त पदासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी १८७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले परंतु राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

त्यानंतर गेल्या १ मार्चपासून पुन्हा एकदा नव्याने प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. परंतु धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने पुन्हा एकदा मुलाखतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आता धर्मादाय आयुक्तांकडून नव्याने तारीख घोषित होईल तेव्हाच निवड प्रक्रियेला मुहूर्त लागणार आहे. तोपर्यंत इच्छुकांची प्रतीक्षा वाढणार आहे.

Web Title: Interviews of trustees for Sant Nivruttinath Sansthan postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.