वणीतील रेशन दुकानदारांची चौकशी
By Admin | Updated: September 1, 2015 22:12 IST2015-09-01T22:10:55+5:302015-09-01T22:12:15+5:30
वणीतील रेशन दुकानदारांची चौकशी

वणीतील रेशन दुकानदारांची चौकशी
वणी : रेशनच्या काळ्याबाजाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पुरवठा विभागाने वणीतील चार रेशन दुकानदारांची कागदपत्रे चौकशीकामी अग्रक्रम दिला असून, या चार दुकानांच्या रेशन वाटपाचे अधिकार इतर चार रेशन दुकानधारकांना दिले आहेत.
वणी येथे एका किराणा व्यापाऱ्याच्या गुदामामध्ये धाड टाकून महसूल, पुरवठा विभाग व पोलिसांनी ८ हजार १०० रुपयांचा नऊ क्विंटल तांदूळ जप्त करून त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान, व्यापाऱ्याने तांदूळ कोणाकडून खरेदी केला यासंदर्भात पोलिसांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. दरम्यान, ‘त्या’ चारही रेशन दुकानदारांचा साठा तपासणी करून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांचा ताळमेळ साठ्याशी जुळतो किंवा नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार त्यांचे काम सुरू आहे. दरम्यान, भातोडे, अहिवंतवाडी, पांडाणे, आंबेवणी येथील रेशन दुकानदारांकडे वणी येथील रेशन दुकान चालविणे व धान्य वाटप ही जबाबदारी पुरवठा विभागाने सोपविली आहे. वणी येथे ३३४८ रेशनकार्डधारक असून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, केसरी व शुभ्र रेशनकार्डधारकांचा यात समावेश आहे. दरम्यान, रेशनकार्डधारकांना रेशन दुकानदार लाभापासून वंचित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास त्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. (वार्ताहर)