Influenza of bird flu in Baglan | बागलाणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

वाठोडा परिसरात दाखल झालेले पशुवैद्यकीय पथक.

ठळक मुद्देकिलिंग ऑपरेशन : ११९२ कोंबड्यांची विल्हेवाट

सटाणा : बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात बर्ड फ्लूने एकाच शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि.२७) या परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शीघ्र कृती दलाने किलिंग ऑपरेशन राबवले.

यामध्ये वगरीपाडा व बारीपाडा या दोघा गावांमधील ११९२ कोंबड्या पथकाने शास्त्रोक्त पद्धतीने पकडून प्रशासनाने केलेल्या खड्ड्यात पुरण्यात आल्या. या ऑपरेशनदरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान बुधवारी जिल्ह्याचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बाबूराव नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गरजे यांच्यासह सहायक आयुक्त डॉ. गिरीश पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. बाळासाहेब होन, डॉ. धनराज चौधरी, डॉ. प्रदीप झोड, डॉ. मिलिंद भणगे यांनी शीघ्र कृती दलाच्या टीमचे नेतृत्व करीत संपूर्ण किलिंग प्रक्रिया पूर्ण केली व या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव थांबण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना या भागातील आदिवासी जनतेला करण्यात आल्या. दरम्यान, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आदिवासी जनतेच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत प्रशासनाला सर्व नुकसानभरपाई देण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली आहे.
इन्फो

गावाचे निर्जंतुकीकरण
प्रशासनाला किलिंग ऑपरेशनदरम्यान पक्षी पुरण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या खासगी जागेत जागा उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपंचायत प्रशासन किलिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण महाले, ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली आहे.

 

Web Title: Influenza of bird flu in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.