▪️ पशुपालक चिंतित : प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मागणी
देवगाव : कोरोना विषाणू संक्रमणाचा ग्रामीण भागातील नागरिकांनी धसका घेतला असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवगावसह चंद्राचीमेट, टाके देवगाव, वावीहर्ष, श्रीघाट, येल्याचीमेट, रायपाडा आदी गावांमध्ये जनावरांना विषाणूजन्य लम्पी स्कीन डिसिजचा (त्वचारोग) धोका बळावला आहे. या आजारावर औषध उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक धास्तावले आहेत. त्यामुळे पशुपालकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मागणी केली आहे, तर शेतकरी, पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
लम्पी स्कीन डिसिज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या-मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्म्य असणारा असून, सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा रोग सर्व वयोगटातील गोवंशीय जनावरांना होतो. लहान वासरे या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात. हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिमाण होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरांना बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो. दरम्यान, या आजाराशी दोन हात करण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यात पाणी साचू देऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. गाई-म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा आजार होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
कोट....
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे होतो. जनावरांच्या गोठ्यात स्वछता नसेल तर जनावरांमध्ये गोचीड, गोमासी होण्याचे प्रमाण वाढते. गोचीड, गोमासीमुळे जनावरांमध्ये मोठ्या गाठी येऊन त्या फुटतात. परिणामी आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत.
डॉ. बी. एस. गांगुर्डे, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, त्र्यंबकेश्वर