औद्योगिक विकासाभिमुख शिक्षणाची गरज
By Admin | Updated: February 21, 2017 01:31 IST2017-02-21T01:31:22+5:302017-02-21T01:31:48+5:30
अनिल काकोडकर : गोखले एज्युकेशनच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रतिपादन

औद्योगिक विकासाभिमुख शिक्षणाची गरज
नाशिक : सध्या विकेंद्रित होत असलेल्या उद्योगांचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाच्या साह्याने ग्रामीण भागात एकत्रीकरण करून शहर व ग्रामीण आणि गरीब, श्रीमंतीची दरी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना औद्योगिक विकासाभिमुख शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
गोपाळकृष्ण गोखले यांचे १५१ वे जयंती वर्ष, गोखले एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन व डॉ. एम. एस. गोसावी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जैन विश्व विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. सुधामाही रेगुनाथन, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ शंकरराव गोवारीकर, प्राचार्य एस. बी. पंडीत, एचएएलचे महाव्यवस्थापक डॉ. बी. एच. व्ही. शेषगिरीराव, डॉ. जी. पी. पानसे, एस. टी. देशमुख, आर. जे. गुजराथी प्रा. बी. देवराज आदि उपस्थित होते. काकोडकर म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागात दरडोई उपन्न निम्म्याहूनही कमी आहे. ग्रामीण भागात ५० टक्के कु टुंबांकडे शेती असल्याचा समज असला तरी प्रत्येक्षात शेतीवर उदरनिर्वाह भागवू शकतील, असे केवळ ३० टक्के कुटुंब आहे. उर्वरित बहुतेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन रोजंदारी आहे. त्यामुळे या वर्गासाठी ग्रामीण भागात औद्योगिक विकास होणे गरजेचे असून, येथील तरुणांना ते उद्योग व्यवसाय करू शकतील, असे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचे काकोडकर म्हणाले. दरम्यान, डॉ. एम. एस. गोसावी यांचा काकोडकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, उद्योजक अतुल चांडक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर व डॉ. विजय गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेला ५० लाख रुपयांची देणगी मिळाली. प्रास्ताविक दीप्ती देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी पेठकर, प्रा. मुग्धा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)