बिबट्याच्या वास्तव्याने इंदिरानगरवासीय भयभीत
By Admin | Updated: September 2, 2015 23:54 IST2015-09-02T23:53:47+5:302015-09-02T23:54:18+5:30
बिबट्याच्या वास्तव्याने इंदिरानगरवासीय भयभीत

बिबट्याच्या वास्तव्याने इंदिरानगरवासीय भयभीत
इंदिरानर : इंदिरानगर परिसरातील नागरिक सध्या बिबट्याच्या वास्तव्याने भयभीत झाले आहेत. गेल्या दहा दिवसांत दोनदा बिबट्याचे दर्शन घडल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र ही केवळ अफवा असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
सुचितानगर येथील एका अपार्टमेंट लगतच्या रस्त्याच्या कडेला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा येथीलच एक महिला आणि लहान मुलाने केला. त्यानंतर परिसरात बिबट्या असल्याची वार्ता पसरली, मात्र त्यानंतर कुणालाही बिबट्याचे दर्शन झाले नाही. या घटनेस दहा दिवस उलटत नाही तोच सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिरासमोरील परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडल्याचा दावा एका नागरिकाने केला आहे.
दहा दिवसांत दोनदा अशा प्रकारची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर घटनास्थळावर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गोसावी यांनाही सदर बाब कळविण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीदेखील संपूर्ण परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत किंवा कुणी ठोस माहिती देण्यासही पुढे येत नसल्याने ही निव्वळ अफवा असावी, असे गोसावी यांनी सांगितले. (वार्ताहर)