सटाण्यातील अपक्ष सदस्य राष्ट्रवादीत
By Admin | Updated: March 2, 2017 01:19 IST2017-03-02T01:19:17+5:302017-03-02T01:19:57+5:30
सटाणा : अपक्ष उमेदवार गणेश अहिरे हे राष्ट्रवादीसोबत गेल्याने आदिवासी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सटाण्यातील अपक्ष सदस्य राष्ट्रवादीत
सटाणा : बागलाण तालुक्यातील पठावेदिगर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले अपक्ष उमेदवार गणेश अहिरे हे राष्ट्रवादीसोबत गेल्याने आदिवासी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘चीत भी मेरी, पट मेरी’ ही उक्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वापरल्याने अपक्ष गणेश अहिरे यांनी पराभूत केलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी भाजपाचा मार्ग आपल्यासाठी खुला असल्याचे सांगून लवकरच त्याबाबत आपण निर्णय जाहीर करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सोनवणे यांच्या भूमिकेमुळे आदिवासी भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
बागलाण तालुक्यातील पठावेदिगर गटात तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आदिवासी नेत्यांनी एकत्र मोट बांधून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे पुत्र गणेश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार संजय सोनवणे यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला. निवडून येताच गणेश अहिरे अक्षरश: गायब झाले. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाच्या एका माजी मंत्र्याच्या इशाऱ्यामुळे आणि जिल्हा परिषदेच्या एका माजी सभापतीच्या मध्यस्थीनंतर अहिरे यांना पक्षाच्या ताब्यात दिल्याचे बोलले जात
असून, एका शिक्षण संस्थेत
नोकरीला असलेल्या अहिरे यांना राजकीय दबावालादेखील बळी पडावे लागले. आदिवासींच्या जिवावर निवडून आलेले अहिरे
यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
(वार्ताहर)