वीरपत्नीचे अतुलनीय धैर्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:55 IST2019-09-28T23:55:33+5:302019-09-28T23:55:50+5:30
पतीला काश्मीरच्या सीमेवर वीरमरण आल्याचे हिमालयाएवढे दु:ख दहाव्या दिवशी बाजूला ठेवत तेराव्याच्या दिवशी सैन्यदलाची परीक्षा देऊन पतीप्रमाणेच ‘फ्लाइंग आॅफिसर’ बनण्याच्या दिशेने झेपावलेली वीरांगना आयुष्याच्या रणसंग्रामातही ‘विजेता’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना काश्मीरमध्ये वीरमरण आले. त्यांच्या पत्नी विजेता निनाद मांडवगणे यांनीदेखील ‘फ्लाइंग आॅफिसर’ बनण्यासाठी मार्चमध्येच ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ची परीक्षा दिली. फ्लाइंग आॅफिसरच्या प्रशिक्षणासाठी हैदराबादला रवाना झाल्या आहेत. न डगमगता विजेता यांनी त्यांचे अतुलनीय धैर्य कायम राखत आणि दररोज फोनवरून वेदिताशी व्हिडीओ कॉल करीत संवाद साधत आई आणि वीरपत्नी अशी दोन्ही कर्तव्ये निभावत आहेत.
मार्च महिन्याच्या अखेरीस त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. विजेता या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असल्या तरी वैद्यकीय चाचणी आणि तंदुरुस्तीमध्ये उत्तीर्ण आणि पात्र होण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दोन वर्षांच्या वेदिता या बालिकेची आई आणि गृहिणी असलेल्या विजेता यांना सैन्यदलात प्रचंड मेहनत करावी लागली.