वकीलवाडीतील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण

By Admin | Updated: October 12, 2016 22:11 IST2016-10-12T22:06:30+5:302016-10-12T22:11:28+5:30

वाहतुकीची कोंडी : फलकांमुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे अवघड

Increasing encroachment on the roads of the lawyer | वकीलवाडीतील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण

वकीलवाडीतील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या वकीलवाडीत व्यावसायिकांनीच रस्त्यांवर फलकांच्या माध्यमातून अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही वाट काढणे अवघड होऊन बसले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
वकीलवाडी परिसरात व्यापारी संकुल असल्याने याठिकाणी नेहमीच गर्दी असते. शिवाय, अरुंद रस्ता असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीही होत असते. सारडा संकुलाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी वाहने लागलेली असतात. त्यामुळे रस्ता आणखीच अरुंद होतो. त्यामुळे छोट्या वाटेवरून वाहन काढणे मुश्कील होऊन बसते. बऱ्याचदा दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या त्रासदायक बनते. पोलिसांकडून या भागात दुचाकी उचलून नेल्या जातात. परंतु वकीलवाडीत काही व्यावसायिकांनी थेट रस्त्यावरच फलक, कमानी थाटल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सध्या दसरा-दिवाळीमुळे खरेदीदारांच्या गर्दीत भर पडते आहे. रस्त्यातील फलकांच्या गर्दीने पादचाऱ्यांना मार्ग काढणे मुश्कील बनते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अन्य भागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाते, परंतु वकीलवाडीत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Increasing encroachment on the roads of the lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.