वाढती गुन्हेगारी की, ठेकेदाराचे भय?
By Admin | Updated: February 12, 2015 00:49 IST2015-02-12T00:28:27+5:302015-02-12T00:49:19+5:30
पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी टाळले

वाढती गुन्हेगारी की, ठेकेदाराचे भय?
नाशिक : होणार, होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पोलीस आयुक्तालयाच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले असून, इमारतीपासून हाकेच्या अंतरावर येऊनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने पोलीस वर्तुळातच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याचा पर्यायाने पोलीस यंत्रणेचा धाक सुटल्याने शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर नाराज होऊन मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन टाळल्याचा अर्थ काढला जात असतानाच, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना ‘मद्यपार्टी’च्या निमित्ताने टक्केवारी देणाऱ्या ठेकेदाराने बांधलेल्या इमारतीचा मुख्यमंत्र्यांनी धसका घेतल्याचेही आता बोलले जात आहे.
नाशिकच्या पोलीस यंत्रणेवर यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची मर्जी खपा झाली असून, त्यासाठी कुंभमेळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निमित्त घडले आहे. वारंवार बजावूनही भाड्यानेच कॅमेरे बसविण्याचा पोलीस यंत्रणेचा अट्टहासाबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे शंकाही घेतलेली असताना त्यांच्या उपस्थितीतच पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट पोलीस प्रमुखांनी घातल्याची बाब बहुधा मुख्यमंत्र्यांना रूचलेली नसल्याचेही आता बोलले जात आहे.
त्यामुळेच की काय महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दोन तास हजेरी लावली व पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे पूर्वनियोजीत उद्घाटन न करता हेलिकॉप्टरने रवानाही झाले. विशेष म्हणजे शरणपूररोडवरील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरले व तेथूनच ते रवाना झाले. हेलिपॅड ते पोलीस आयुक्तालयाची नूतन इमारत यातील अंतर जेमतेम दशशतक मीटर म्हणजेच हजार मीटरच असताना मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने केलेली तयारी वाया गेली आहे. शहरातील गुन्हेगार मोकाट सुटले असून, गुन्हेगारी कारवायांनी नागरिक त्रस्त झालेले आहेत. दिवसाढवळ्या खून, व्यापाऱ्यांची लूट, धाडसी चोऱ्या-घरफोड्यांनी लाखोंचा ऐवज लुटला जात आहे. महिलांचे मंगळसूत्र असुरक्षित होऊन आर्थिक फसवणुकीच्या घटना पाहता पोलिसांचा धाक कमी झाल्याचा अर्थ काढला जात आहे. (प्रतिनिधी)