कादवा साखर कारखान्याची वाढली गाळपक्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:10 IST2020-01-13T18:09:20+5:302020-01-13T18:10:52+5:30
श्रीराम शेटे : ३९ दिवसात ८५ हजार मे.टन गाळप

कादवा साखर कारखान्याची वाढली गाळपक्षमता
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने जुनी मशिनरी बदलावताना अधिक क्षमतेची व अत्याधुनिक टाकल्याने कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून ३९ दिवसात ८५ हजार उसाचे गाळप होऊन ९३ हजार क्विंटल साखर निर्मिती झाल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.
माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कादवा कारखान्याला भेट देऊन शेटे यांच्याशी विविध प्रश्नांसंबंधी चर्चा केली. यावेळी शेटे यांनी कादवाच्या गेल्या तेरा वर्षातील वाटचाल सविस्तरपणे विशद करतानाच कमी दिवसात जास्त गाळप व्हावे यासाठी टप्प्याटप्प्याने दुरु स्ती करताना आधुनिकीकरण केल्याने गाळप कार्यक्षमता दुप्पट वाढली असल्याचे सांगितले. त्यामुळे वेळेत ऊस तोडणी होत कमी दिवसात जास्त गाळप होणार आहे. कादवाने ३९ दिवसात ८५ हजार ३९४ मे. टन उसाचे गाळप केले असून ९३ हजार १७५ क्विंटल साखर निर्मिती झाली असून सरासरी साखर उतारा ११.१८ टक्के इतका आहे. मार्च अखेर सर्व ऊस तोड करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवले आहे. जास्तीत जास्त ऊस लागवड व्हावी यासाठी संचालक मंडळ गावोगाव ऊस विकास लागवड सभा घेत शेतकऱ्यांना आवाहन करत असल्याचेही शेटे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख,बबनराव जाधव ,माजी उपसभापती वसंतराव थेटे, विठ्ठलराव अपसुंदे, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, जि. प सदस्य भास्कर भगरे, माजी सभापती सदाशिव शेळके, लहानू पाटील, जीवन मोरे, गुलाब जाधव,संचालक दिनकर जाधव, त्र्यंबक संधान, बापू पडोळ आदी उपस्थित होते.