ईदच्या पुर्वसंध्येला दुधाला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 18:06 IST2020-05-24T18:05:20+5:302020-05-24T18:06:48+5:30

दुध संपुर्ण महिनाभर ६५ रूपये प्रतिदराने विकले गेले तसेच ईदच्या पुर्वसंध्येला दुध बाजारात तर चक्क दहा रूपयांनी लिटरमागे वाढ झाली. ७० रुपये लिटर या दराने दुधाची किरकोळ बाजारात विक्री झाली.

Increased | ईदच्या पुर्वसंध्येला दुधाला मागणी वाढली

ईदच्या पुर्वसंध्येला दुधाला मागणी वाढली

ठळक मुद्दे‘शिरखुर्मा’ तयार करण्यासाठी दुधाचा वापर

नाशिक : रमजान ईदच्या पुर्वसंध्येला रविवारी (दि.२४) जुने नाशिकसह मुस्लीम बहुल भागात दुधाला मागणी वाढल्याचे दिसून आले. नागरिकांनी दुपारी चार वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दुध खरेदीसाठी किरकोळ दुधविक्रीच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. दुधाच्या भावात प्रतिलिटर पाच ते दहा रूपयांनी अचानकपणे वाढ झाली. जुन्या नाशकातील दुध बाजारात ७० रूपये लिटर दराने म्हशीच्या दुधाची विक्री झाली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने नाशिक दुधबाजार भागात, वडाळारोड काझीनगर, वडाळागाव आदि परिसरात दुधाला मागणी वाढली होती. दुधखरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली; मात्र यावेळी विक्रेत्यांनी ‘डिस्टन्स’ पालन करण्यास प्राधान्य देण्यास सांगितले. रमजान पर्व काळात दुध ६० ते ६५ रुपये प्रती लिटर दराने विकले जात होते; मात्र ईदच्या पुर्वसंध्येला लिटरमागे पाच रूपयांनी वाढ झाल्याने नागरिकांनी नाराजी दर्शविली तर दुसरीकडे मागणीच्या तुलनेत पुरवठा कोरोना व लॉकडाउनमुळे कमी पडत असल्यामुळे दरवाढ केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे चाऱ्याची चणचण तसेच परप्रांतीय मजुर कामगार वर्गदेखील मुळ गावी गेल्याने दुधाच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने आता शहरातील मिठाईची दुकानेही हळुहळु सुरू झाली आहे. यामुळे दुधाला मागणी वाढली आहे. जोपर्यंत मिठाईची दुकाने बंद होती तोपर्यंत दुध ५५ ते ६० रूपये प्रतिलिटर दराने विकले जात होते, मात्र मिठाईची दुकाने सुरू होताच ऐन रमजान पर्वकाळात दुधाचे दर भडकले. दुध संपुर्ण महिनाभर ६५ रूपये प्रतिदराने विकले गेले तसेच ईदच्या पुर्वसंध्येला दुध बाजारात तर चक्क दहा रूपयांनी लिटरमागे वाढ झाली. ७० रुपये लिटर या दराने दुधाची किरकोळ बाजारात विक्री झाली. ईदच्या निमित्ताने ‘शिरखुर्मा’ तयार करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. यामुळे दुधाला मागणी वाढते.

Web Title: Increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.