शहरात चोरीच्या घटनांत वाढ
By Admin | Updated: July 22, 2015 01:23 IST2015-07-22T01:21:11+5:302015-07-22T01:23:26+5:30
चोरट्यांचीही पर्वणी : अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेची गरज

शहरात चोरीच्या घटनांत वाढ
नाशिक : सिंहस्थ पर्वणीचे दिवस जवळ येत असताना शहरातील चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असून, येणाऱ्या गर्दीत हात साफ करण्यासाठी शहराबरोबरच बाहेरील चोरटेही सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिंहस्थात नाशिकला लाखो भाविकांची गर्दी होणार असून, त्याची झलक आता दिसू लागली आहे. रामकुंडापासून ते त्र्यंबकपर्यंत अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळे सध्या भाविकांच्या गर्दीने गजबजली आहेत. गोदाघाटावरील वाहनतळांवर आता वाहने लावायला जागा राहिली नाही. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेण्यासाठी आता चोरटेही सक्रिय झाल्याचे शहरात घडलेल्या काही गोष्टींवरून दिसून येत आहे. त्यात काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, तर काही परराज्यातून आलेले नागरिक तक्रार दाखल न करताच निघून जात असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येत नसल्याचे दिसत आहे.
सिंहस्थ धर्मध्वज मिरवणुकीतच याची प्रचिती नाशिककरांना आली असून, त्याच दिवशी सोन्याची पोत चोरल्याच्या किमान तीन तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. याशिवाय आता घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे. दि. १४ रोजी गाडगे महाराज पुलाखालून पांढऱ्या रंगाची ४५ हजार रुपयांची मारुती कार ८०० चोरीला गेल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दुसऱ्या घटनेत राजीव गांधी भवन परिसरात लावलेल्या चारचाकीमधून २५ हजार रुपयांचा लॅपटॉप आणि ४७ हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मेहेर सिग्नल परिसरात चारचाकी वाहन लावले असता अज्ञात चोरट्याने १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यात लॅपटॉप, कॅमेरा, टॅब, ५० हजार रुपये रोख याचा समावेश आहे.
दि. ३ रोजी सिटी सेंटर मॉल समोरील पार्किंगमधून २५ हजार रुपये किमतीची हीरो होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरीस गेली आहे. दि. १७ रोजी गंगापूररोड येथील हॉटेल कृष्णासमोर लावलेल्या सॅण्ट्रो कारचा दरवाजा उघडून त्यातून १२ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. यांसारख्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सिंहस्थासाठी शहरात येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांमधूनही वस्तू चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)