वाढीव पीककर्ज एकरकमी द्यावे;
By Admin | Updated: March 8, 2015 01:34 IST2015-03-08T01:33:44+5:302015-03-08T01:34:32+5:30
वाढीव पीककर्ज एकरकमी द्यावे मंडळाला निवेदन

वाढीव पीककर्ज एकरकमी द्यावे;
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँक ही शेतकऱ्यांच्या जिवावर उभी असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व आधीच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज भरणे अवघड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी कर्जवाटप करताना ते एकरकमी देण्यात यावे. तसेच मागी कर्ज फेडण्यासाठीही मुदत देण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन जिल्हा बॅँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील व राजेंद्र डोखळे यांनी प्रशासक मंडळाचे सदस्य तुषार पगार यांना दिले. जिल्हा बॅँकेचे चालूवर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष व डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राहिलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी व संरक्षक साधने यांचा वापर करावा लागणार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच गणपतराव पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांसह प्रशासक, कार्यकारी संचालक व अधिकारी यांना भेटून निवेदन दिले होते. यावेळी जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळाने शेतकऱ्यांचे पीककर्ज धोरण वाढवून देण्याचेही मान्य केले होते, मात्र दरम्यानच्या काळात पुन्हा अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीककर्ज देताना ते एकरकमी देण्यात यावे, अशी मागणी राजेंद्र डोखळे, गणपतराव पाटील व प्रकाश वडजे यांनी जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळाकडे केली आहे. (प्रतिनिधी)