२0१५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: January 1, 2016 00:06 IST2016-01-01T00:06:16+5:302016-01-01T00:06:16+5:30
सातपूर पोलीस ठाणे : चोऱ्या-घरफोडीच्या घटना अधिक

२0१५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ
गोकुळ सोनवणे सातपूर
मागील वर्षापेक्षा यावर्षी चोऱ्यामाऱ्या आणि घरफोड्यांच्या सर्वाधिक घटनांबरोबरच हाणामारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तर वाहनचोरी, विनयभंग, मोटार अपघात, खून आणि खुनाचा प्रकार हे गुन्हेदेखील घडले असून, दोनशेपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत.
सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सातपूर औद्योगिक वसाहतीबरोबर प्रबुद्धनगर, स्वारबाबानगर, संतोषीमातानगर, कांबळेवाडी, भीमनगर आदि झोपडपट्टींचा समावेश आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. तर चोऱ्यांबरोबरच घरफोडीच्या घटनादेखील घडत आहेत. चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. चोऱ्या आणि घरफोड्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे खुनाच्या तीन घटना आणि खुनाचा प्रयत्नदेखील घडला आहे. दंग्याच्याही घटनांची नोंद आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटनाही घडली आहे. मोटर अपघातांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचप्रमाणे प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गुन्ह्यांच्या प्रमाणात घट व्हावी, सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी दूर व्हावी, यासाठी सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरात नागरिक- पोलीस संवाद, पोलीस अधिकाऱ्यांची सायकल पेट्रोलिंग, चौक सभा आदि सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.