मालेगावी पोलीस बंदोबस्तात वाढ; पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:21+5:302021-09-19T04:16:21+5:30
मालेगाव : आज, रविवारी होत असलेल्या श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व महापालिका यंत्रणेने तयारी ...

मालेगावी पोलीस बंदोबस्तात वाढ; पोलिसांचे पथसंचलन
मालेगाव : आज, रविवारी होत असलेल्या श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व महापालिका यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, तर महापालिकेने १३ ठिकाणी तात्पुरते गणेशकुंड उभारले आहेत. महादेव घाटावरील गणेशकुंड परिसरासह टेहरे- सोयगाव फाट्यावरील गिरणा नदी पात्र परिसरातही लोखंडी जाळ्या, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन(रुटमार्च) केले. गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. सार्वजनिक मिरवणुकींना बंदी असली असली तरी पोलीस यंत्रणेने बंदोबस्तात वाढ केली आहे. गणेश उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट दिसून आले. भाविकांनी घरातच श्रींची प्रतिष्ठापना केली होती. लाडक्या बाप्पाला रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने शहरातील मुख्य चौकात व मिरवणूक मार्गांवर बंदोबस्त तैनात केला आहे. यात पोलीस उपाधीक्षक ३, पोलीस निरीक्षक १३ सहायक पोलीस निरीक्षक ३२, पुरुष हवालदार २३५ महिला हवालदार १६ गृहरक्षक दलाचे जवान १६६ समावेश आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दलाची प्रत्येकी एक तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मुल्लावाडा, पेरी चौक, मोहम्मद अली रोड, सरदार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नियंत्रण कक्ष परिसरात पथसंचलन केले होते.